नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि दिग्दर्शक ओम राऊत यांचा आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. सोशल मिडियावर या टीझरला चांगलंच ट्रोल केलं गेलं. चित्रपटातील स्पेशल इफेक्ट आणि व्हीएफएक्स याबाबतीत लोकांनी सडकून टीका केली आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स हे कार्टून फिल्मसारखे वाटत असून यातील काही दृश्यं इतर चित्रपटांमधून चोरल्याचे आरोपही प्रेक्षकांनी केले आहेत.
सगळ्या स्तरातून या चित्रपटाला विरोध होत आहे. सैफ अली खान साकारत असलेल्या रावणाच्या भूमिकेचं सादरीकरण लोकांना चांगलंच खटकलं आहे. याबद्दल सोशल मीडियावर सगळेच व्यक्त होत आहेत. भोपाळच्या भाजपा प्रवक्ते यांनी यावर भाष्य केलं असून चित्रपटातील रामायणाचं सादरीकरण हे चुकीचं असल्याचं स्पष्ट केलं आहे. यांच्या पाठोपाठ मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनीही याबाबत वक्तव्यं केलं आहे.
आणखी वाचा : कतरिनाला पाहून प्रेक्षकांची उडणार घाबरगुंडी; या चित्रपटात दिसणार भूताच्या भूमिकेत
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या चित्रपटावर टीका केली आहे. चित्रपटात हिंदू धर्म आणि त्याच्याशी निगडीत श्रद्धास्थानाचे चुकीचे चित्रण केल्याचं स्पष्ट केलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. नरोत्तम मिश्रा म्हणाले, “आम्हाला या चित्रपटाच्या सादरीकरणावर आपत्ती आहे. हिंदू श्रद्धास्थानांचे असे चित्रण करणे योग्य नाही. मी दिग्दर्शक ओम राऊत यांना पत्र लिहून काही आपत्तीजनक दृश्यं काढून टाकण्यास विनंती करणार आहे. जर तसं झालं नाही तर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल.”
‘आदिपुरुष’च्या टीझरवर भाजपा प्रवक्त्या मालविका अविनाश यांनीही त्यांचं मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या, “रामायण ही आपली ओळख आहे. रामायण हे आपल्या राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतं, त्यामुळे कुणीही ही गोष्ट गृहीत धरू नये. ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ज्यापद्धतीने चित्रीकरण केले आहे त्यामुळे मला खूप यातना झाल्या आहेत.” आदिपुरुष १२ जानेवारी २०२३ या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.