अभिनेत्री मृणाल ठाकूरने बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सीता रामम’ आणि नुकताच डिसेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘हाय नन्ना’ या दोन्ही चित्रपटांमुळे दक्षिणेत मृणालची एक वेगळी ओळख निर्माण झाली. तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. ‘हाय नन्ना’च्या यशानंतर मृणालने नुकतीच पिंकव्हिलाला मुलाखत दिली. यावेळी तिने अनेक खुलासे केले.
‘हाय नन्ना’च्या यशानंतर एखाद्या चाहत्याची लक्षात राहिलेली प्रतिक्रिया कोणती? असा प्रश्न मृणालला विचारला असता ती म्हणाली, “माझा एक चाहता मवा म्हणाला की, मी नुकताच ‘हाय नन्ना’ पाहिला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला चित्रपट पाहताना कुठेच सीता महालक्ष्मी (सीता रामम चित्रपटातील भूमिका) दिसली नाही. माझ्या डोळ्यासमोर फक्त यशना (हाय नन्ना मधील भूमिका) होती. ही माझ्या कामाची सर्वात मोठी पोचपावती होती.”
हेही वाचा : ‘झी मराठी’च्या ‘शिवा’ मालिकेत झळकणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता, २ वर्षांनी करणार कमबॅक; तुम्ही ओळखलंत का?
मृणाल पुढे म्हणाली, “या दोन्ही चित्रपटांमुळे मला माझे चाहते ‘क्वीन ऑफ रोमान्स’ म्हणू लागले आहेत. ही प्रतिक्रिया ऐकून मी खरंच भारावून जाते. कारण शाहरुख सरांना ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हटलं जातं. त्यांच्या सगळ्या चित्रपटांमधून ते सिद्ध होतं. मी सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. त्यामुळे ‘क्वीन ऑफ रोमान्स’ ऐकलं की मला लगेच शाहरुख सर आठवतात.”
दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हाय नन्ना’मध्ये बापलेकीच्या नात्याची हृदयस्पर्शी कथा मांडण्यात आली आहे. सुपरस्टार नानी, मृणाल ठाकूर आणि बालकलाकार कियारा खन्ना यांच्या यामध्ये प्रमुख भूमिका आहेत. तसेच मृणाल ठाकूरच्या आईच्या भूमिकेत चित्रपटात ‘तू तेव्हा तशी’ फेम अभिनेत्री शिल्पा तुळसकर झळकली आहे.