मराठमोळी अभिनेत्री मुग्धा गोडसेनं ‘फॅशन’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक झालं आणि तिला फिल्मफेअरचा ‘बेस्ट डेब्यू’ पुरस्कारही मिळाला. त्यानंतर ‘ऑल द बेस्ट’, ‘जेल’, ‘हिरोईन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली. मुग्धा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अभिनयासह वैयक्तिक आय़ुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करीत असते.
नुकताच एका ठिकाणी मुग्धाच्या आईला एक वाईट अनुभव आला. याबाबत तिनं परखडपणे आपलं म्हणणं सोशल मीडियावर मांडलं आहे. मुग्धा गोडसेनं तिच्या अधिकृत एक्सच्या अकाउंटवर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्रीने लिहिलं, “हे खूप चुकीचं आहे. कृपया मालाड पश्चिम, मुंबई येथील इनॉर्बिट मॉलमध्ये असलेल्या नामांकित रेस्टॉरंटमध्ये कार्यरत असलेल्या तुमच्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्या. काल माझ्या आईनं आणि मी खूप खरेदी केल्यानंतर ‘चायोस’मधून चहा घेतला. बाजूच्या दुकानातून काहीतरी आणण्यासाठी मी तिला तेथे पाच मिनिटांसाठी एकटीला सोडून गेले होते. परत येताच मी पाहिलं की, ती दुकानाबाहेर जड शॉपिंग बॅग हातात घेऊन असहायपणे उभी होती. तिला असं पाहून मला धक्काच बसला. माझ्या ७० वर्षांच्या आईची विचारपूस केल्यावर तिनं सांगितलं की, तिथल्या कर्मचाऱ्यांनी तिला तिथून जाण्यास सांगितलं. कारण- सहा ते सात लोकांना तिच्या जागेवर बसायचं होतं.”
मुग्धाने पुढे लिहिलं, “मग मी त्या रेस्टॉरंट मॅनेजर दृष्टी यांना विनम्रपणे याबाबत कल्पना दिली; पण त्यांनी त्यांची चूक कबूल केली नाही. ज्या देशात आपण वृद्ध माणसांचा आदर करतो, तिथे अशी वागणूक मिळणं हा न्याय आहे का? माझी यामुळे खूप घोर निराशा झाली आहे.”
हेही वाचा… “बुरी नजरवाले…”, आलिया भट्टने कानामागे लावला काजळाचा टिका; अभिनेत्रीचा मेट गालातील ‘तो’ फोटो व्हायरल
मुग्धाच्या या पोस्टवर एक्सच्या अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. एकानं या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिलं, “आजकाल माणसांमधली माणुसकी नष्ट झाली आहे.” “मलाही एका मॉलमध्ये असा अनुभव आला आहे,” असं एक जण म्हणाला.
हेही वाचा… गुड न्यूज दिल्यानंतर पहिल्यांदाच दिसला दीपिका पदुकोणचा बेबी बंप; अभिनेत्रीचा अनसीन फोटो व्हायरल
मुग्धाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच या रेस्टॉरंटच्या मालक व फाउंडरनं तिच्या एक्स पोस्टवर प्रतिक्रिया दिली. नितीन सालुजानं कमेंट करीत लिहिलं, “मुग्धा, हे अगदीच आश्चर्यकारक आहे. मी तुमच्या आईची आणि तुमची मनापासून माफी मागतो आणि मी त्यांच्यावर त्वरित कारवाई करतो. तुम्हाला अशी वागणूक मिळाली हे सांगितल्याबद्दल धन्यवाद! जर तुमची हरकत नसेल, तर कृपया करून मला तुमचा नंबर मेसेज कराल का? मला तुमच्या आईची वैयक्तिक माफी मागायची आहे.”