खिलाडी कुमार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. हा अभिनेता आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आता मात्र एका निर्माता व कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्राने एका मुलाखतीदरम्यान अक्षय कुमारबाबत वक्तव्य केल्याने अभिनेता सध्या चर्चेत आला आहे.
मुकेश छाब्राने अक्षय कुमारविषयी काय म्हटले?
रणवीर अलाहबादियाच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत, अक्षय कुमारविषयी बोलताना मुकेश छाब्राने म्हटले, “दोन वर्षांपूर्वी माझ्या आईला हृदयविकार झाला होता. मला त्यावेळी चित्रपट निर्माते आनंद एल. राय यांनी मला सांगितले की, ज्या डॉक्टरांकडून तुला तुझ्या आईवर उपचार करायची गरज आहे, ते अक्षय कुमारच्या जवळचे आहेत. मी अक्षय कुमारला मेसेज केला आणि लगेच अक्षय कुमारचा मला फोन आला. त्याने दवाखान्यात सगळी व्यवस्था केली. तो १५ दिवस सलग मला न चुकता फोन करायचा. तुझी आई कशी आहे? तू कसा आहेस? हे मला विचारत असे. डॉक्टरबरोबरदेखील तो सतत बोलत असायचा. तो त्याच्या कामात खूप व्यग्र असायचा; पण तरीही तो हे करीत होता.
माझ्या आईच्या प्रकृतीबद्दल काळजीने विचारपूस करीत होता. मी हे सगळे कधीच विसरू शकत नाही. नंतर त्याने माझ्या आईची भेटदेखील घेतली होती. आम्ही एकमेकांच्या इतके जवळ नव्हतो, तरीही तो माझ्या मदतीसाठी धावून आला. एखादा माणूस तुमच्या मदतीसाठी अशी पावले उचलतो तेव्हा तुम्ही त्याच्या अत्यंत जवळचे असले पाहिजे. मात्र, आमच्या बाबतीत तसे नव्हते. त्या घटनेनंतर आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो; पण मी तो क्षण कधी विसरू शकत नाही. अक्षय कुमार त्याने केलेल्या मदतीबद्दल कधीही बोलत अशी आठवण दिग्दर्शकाने सांगितली आहे.
हेही वाचा: Shilpa Shetty : लाडकी बहीण योजनेवर शिल्पा शेट्टीची पोस्ट, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी..”
मुकेश छाब्रा यांच्या आईचे २०२३ मध्ये निधन झाले. दिग्दर्शकाच्या कामाबद्दल बोलायचे, तर ते रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’ या आगामी चित्रपटात त्यांनी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले आहे.
अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे, तर त्याचा खेल खेल में हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा विनोदी चित्रपट असून, या सिनेमात अनेक कलाकारांचा समावेश आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल करू शकला नाही. प्रेक्षकांचा प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला नसल्याचे पाहायला मिळाले. याआधी आलेल्या सरफिरा हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.