शाहरुख-काजोलचा एव्हरग्रीन चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ ज्याची चर्चा आजही होते. देशभरातच नव्हे तर जगभरात या चित्रपटाचे चाहते आहेत. लंडनमध्ये वाढलेले हिरो हेरॉईन, यूरोपमध्ये झालेली भेट, मायदेशात लग्न अशी भट्टी या चित्रपटाची होती. अशा पुरेपूर मसाला असलेल्या चित्रपटाचा रिमेक करण्याची इच्छा अनेकांना आहे.
नुकतंच बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी ‘DDLJ’च्या रिमेकवर भाष्य केलं आहे. फरीदून शहरयारशी संवाद साधताना मुकेश यांनी ‘DDLJ’च्या रिमेकमध्ये कोणाला मुख्य भूमिकेत घ्यायची इच्छा आहे याविषयी खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शाहरुख खानचा लेक आर्यन खान या रिमेकसाठी अगदी योग्य आहे.
आणखी वाचा : “माझ्याशी चर्चा न करताच…” ‘देवदास’मधून आपला पत्ता कट होण्याबद्दल सैफ अली खानने केलेलं भाष्य
आर्यन हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे आणि त्याचा चार्मही वेगळाच आहे त्यामुळे तो यातील मुख्य भूमिकेसाठी अगदी योग्य असल्याचं मुकेश यांनी सांगितलं. याबरोबरच काजोलची मुलगी नीसा देवगण हिला या रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत घ्यायची इच्छा मुकेश यांनी व्यक्त केली. इतकंच नव्हे तर नीसा सध्या अभिनयाचं प्रशिक्षण घेत असून यासाठी ती उत्तम निवड असू शकते असं मुकेश यांचं म्हणणं आहे.
शाहरुख आणि काजोल ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी आहे आणि ते एकमेकांचे चांगले मित्रही आहेत. या दोघांची मुलंसुद्धा एकमेकांचे चांगले मित्र असल्याने भविष्यात आर्यन आणि नीसा एकत्र काम करण्याची शक्यता आहे. आणि मुकेश छाब्रा यांनी केलेल्या वक्तव्यानुसार ‘DDLJ’च्या रिमेकमध्ये हे दोघे भविष्यात झळकण्याची शक्यता नाकारता येणार नाही.