‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर यातील संवाद, व्हिएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या लुकवरून नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता ‘शक्तिमान’ची भूमिका साकारलेल्या मुकेश खन्ना यांनी चित्रपटाच्या कलेक्शनबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपले मत मांडले आहे.
‘आदिपुरुष’ चित्रपटाने सहा दिवसांमध्ये ३४८.९० कोटींचा गल्ला जमवला असल्याचा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. या आकडेवारीवर अभिनेते मुकेश खन्ना यांनी आक्षेप घेतला आहे. मुकेश खन्ना यांनी यापूर्वीही ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत प्रतिक्रिया देत लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या निर्मात्यांवर टीका करीत मुकेश खन्ना यांनी ‘आदिपुरुष’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा : आलिया भट्टच्या हॉलीवूड पदार्पणासाठी महेश भट्ट आहेत उत्सुक; कौतुक करीत म्हणाले, “मला माझ्या लेकीचा…”
मुकेश खन्ना म्हणाले, “चित्रपटाचे निर्माते जो आकडा दाखवत आहेत त्याचा पुरावा कुठे आहे? ही कमाई खरी नसून हे फसवे आकडे आहेत. या चित्रपटामुळे अनेक लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. मला वाटते देशातील काही लोकप्रतिनिधींनी अशा निर्मात्यांना कठोर संदेश दिला हवा की तुम्ही अशाप्रकारे धार्मिक भावनांशी खेळू शकत नाही. लोकांनी एकत्र येऊन त्यांना धडा शिकवावा, असे मला वाटते. यात घाबरण्यासारखे काही नाही. उद्या इतर कोणताही चित्रपट बनवताना निर्मात्यांनी शंभर वेळा विचार केला पाहिजे.”
हेही वाचा : “असित मोदींनी जाहीर माफी मागावी” ‘तारक मेहता’ फेम जेनिफर मिस्त्रीने केली मागणी; म्हणाली, “त्यांनी माझ्यावर…”
मुकेश खन्ना पुढे म्हणाले, “प्रत्येक दसऱ्याला गावात रामलीला होते. मुलं जाऊन नाटक बघतात, त्यांना रामायणाची कथा आणि त्यातील मूल्ये माहीत आहेत. त्यामुळे पडद्यावर असे काही दाखवून निर्मात्यांनी लोकांना मूर्ख आणि अज्ञानी ठरवले आहे.”