शक्तिमान फेम अभिनेते मुकेश खन्ना हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी अलीकडेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर तिच्या रामायणाबद्दलच्या अज्ञानावर टीका केली. २०१९ मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सोनाक्षीने हजेरी लावली होती, त्यावेळी तिला रामायणावर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे ती उत्तर ती देऊ शकली नव्हती. यावरून मुकेश खन्ना यांनी आता सोनाक्षीच्या वडिलांवर, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यावरही टीका केली आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना त्यांचे प्रसिद्ध ‘शक्तिमान’ हे पात्र आजच्या पिढीसाठी किती महत्त्वाचे ठरू शकते यावर चर्चा करत होते. ते म्हणाले, “मला वाटतं की आजच्या मुलांना शक्तिमानच्या मार्गदर्शनाची गरज १९७० च्या पिढीपेक्षा जास्त आहे. आजची मुलं इंटरनेटमुळे चुकीच्या दिशेने जात आहेत. त्यांना फक्त गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये रस आहे, आणि काही दिवसांनी त्यांना त्यांच्या आजी-आजोबांची नावेही आठवणार नाहीत. एका मुलीला तर हेही माहिती नव्हतं की भगवान हनुमानाने संजीवनी बुटी कुणासाठी आणली होती.”
जेव्हा मुलाखतकर्त्याने विचारले की, “तुम्ही सोनाक्षी सिन्हाचा उल्लेख करताय का?” त्यावर मुकेश यांनी होकार दिला. त्यांनी स्पष्ट केले, “हो, आणि हे त्या मुलीच्या संस्कारांच्या अभावामुळे झालं आहे. तिच्या वडिलांचे नाव शत्रुघ्न सिन्हा आहे तिच्या भावांची नावे लव आणि कुश आहेत तरी तिला रामायणाबद्दल नीट माहिती नाहीये .”
ते पुढे म्हणाले, “लोकांनी सोनाक्षीवर टीका केली की तिला हे कसं ठाऊक नाही? पण मी म्हणेन की तीचं चुकलं नाही, यात तिच्या वडिलांची चूक आहे. त्यांनी त्यांच्या मुलांना हे का शिकवलं नाही? ते इतके आधुनिक का झाले? जर मी आज शक्तिमान असतो, तर मी मुलांना बसवून भारतीय संस्कृती आणि सनातन धर्म शिकवला असता.”
२०१९ ला ‘केबीसी ११’मध्ये सोनाक्षीला विचारण्यात आले की, “रामायणानुसार हनुमानाने संजीवनी बुटी कुणासाठी आणली?” पर्याय होते: सुग्रीव, लक्ष्मण, सीता आणि राम. ती उत्तर देताना गोंधळली आणि तिने लाइफलाइनचा वापर केला. या गोष्टीमुळे तिला ट्विटरवर प्रचंड रोषाचा सामना करावा लागला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनीही तिच्या अज्ञानावर टिप्पणी केली. त्यांनी म्हटलं, “तुझ्या वडिलांचे नाव शत्रुघ्न आहे, तू ज्या घरात राहतेस त्याचं नाव रामायण आहे. तुझे जेवढे काका आहेत, त्यांची नाव रामायणाशी संबंधित आहेत.आणि तरी तुला हे माहिती नाही की हनुमानाने जडीबुटी लक्ष्मणासाठी आणली होती.”