अभिनेते मुकेश खन्ना(Mukesh Khanna) हे बॉलीवूड चित्रपटांसाठी ओळखले जातात. मात्र, टीव्हीवरील शक्तीमान या मालिकेने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. अनेकजण त्यांना शक्तीमान म्हणून ओळखतात. ज्येष्ठ अभिनेते अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे मोठे चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची मी मिमिक्री करतोय, असे अनेकांनी त्यांना म्हटल्याचे त्यांनी वक्तव्य केले होते. त्यांच्या अभिनयाबरोबरच ते त्यांच्या परखड वक्तव्यामुळे मोठ्या चर्चेत असतात. आता त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संपूर्ण देश माझ्या पाया पडतो. मात्र, आता हा शिष्टाचार इंडस्ट्रीमधून नाहीसा होत असल्याचे वक्तव्य केले. तसेच कपील शर्मामध्ये शिष्टाचार नसल्याचे म्हटले आहे. मुकेश खन्ना कपिल शर्माबाबत नेमकं काय म्हणालेत, हे जाणून घेऊयात.
तो जवळजवळ २० मिनिटे…
मुकेश खन्ना यांनी नुकतीच ‘अनसेन्सॉर विथ शार्दुल’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत कपिल शर्माबद्दल मुकेश खन्ना म्हणाले, “मला कपिल शर्मा का आवडत नाही आणि का मला त्याच्या शोमध्ये जाण्यास नकार दिला. याचे एक कारण आहे. ती गोष्ट सर्वांचे डोळे उघडणारी आहे. गोल्ड पुरस्कार सोहळ्यात मला एक पुरस्कार देण्यात आला होता. त्या पुरस्कार सोहळ्यात कपिल शर्मादेखील उपस्थित होता. तो त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नवीन आला होता. त्यालादेखील पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी तो कॉमेडी सर्कस हा शो करायचा. तो आला आणि माझ्या शेजारी बसला. त्याने मला ओळखही दिली नाही. तो जवळजवळ २० मिनिटे तिथे बसला होता. पुरस्कारासाठी जेव्हा त्याचे नाव घेण्यात आले तेव्हा तो पुरस्कार घेऊन गेला.”
पुढे मुकेश खन्ना यांनी अनेक कलाकारांना सार्वजनिक ठिकणी भेटल्याची उदाहरणे दिली. मुकेश खन्ना म्हणाले, “मी अमिताभ बच्चन यांना अनेकदा विमानात भेटलो आहे. मी लंडनहून परत येत होतो, त्याचवेळी अमिताभ बच्चनदेखील लंडनहून परतत होते. आमची विमानात भेट झाली. आम्ही एकमेकांना तसे ओळखत नाही. पण त्यांना माहित होते आम्ही दोघेही कलाकार आहे. आम्ही दोघे एकमेकांशी बोललो.” पुढे ते म्हणाले, एकदा हृतिक रोशन व मी विमानतळावर उभे होतो. तो मला भेटला आणि म्हणाला की विमानतळावर दोन सुपरस्टार उभे आहेत. जरी तुम्ही एखाद्या व्यक्तीला कधीही भेटला नसाल तरी तुम्ही त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्याशी बोलता, हे संस्कार आहेत. इंडस्ट्रीमधील ही बंधुता आहे. पण, कपिल शर्मामध्ये जरासुद्धा शिष्टाचार नाही”, असे परखड वक्तव्य मुकेश खन्ना यांनी केले.
मुकेश खन्ना यांना महाभारत या मालिकेतील भीष्म या भूमिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली. सध्या ते युट्यूबवर अनेक कलाकारांच्या मुलाखती घेताना दिसतात. दरम्यान, कपिल शर्मा ‘द ग्रेट इंडिया कपिल शो’ या शोमध्ये दिसत आहे. कपिल शर्माचा चाहतावर्ग मोठा आहे.