महाभारत’ आणि ‘शक्तिमान’ या मालिकांतील अनुक्रमे भीष्म व शक्तिमान या भूमिकांमुळे अभिनेते मुकेश खन्ना(Mukesh Khanna) यांना खूप मोठी लोकप्रियता मिळाली. त्याबरोबरच, ‘सौदागर’, ‘तहलका’, ‘यादगार’ अशा अनेक चित्रपटांतदेखील त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाबरोबरच मुकेश खन्ना हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. याआधी अनेकदा त्यांनी मुकेश खन्ना हे अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्या अभिनयाची नक्कल करतात, या त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपावर उत्तर दिले आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या समकालीन कलाकारांबद्दल वक्तव्य केले. तसेच, अमिताभ बच्चन यांच्याबाबत वक्तव्य केले आहे.

तर लोक अमिताभजींना म्हणाले असते…

मुकेश खन्ना यांनी नुकतीच अनसेन्सॉर विथ शार्दुल या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत मुकेश खन्ना हे अमिताभ बच्चन यांची नक्कल करतात. यावर म्हणाले, “जेव्हा देव माणसाचे साचे तयार करीत असेल तेव्हा माझा आणि अमिताभ बच्चन यांचा साचा मिसळला असेल. त्यामुळे लोक माझ्याविषयी म्हणतात की, हा अमिताभजींची कॉपी करत आहे. जर मी अमिताभ बच्चन यांच्याआधी इंडस्ट्रीमध्ये आलो असतो, तर लोक अमिताभजींना म्हणाले असते की, तो मुकेश खन्नांची कॉपी करत आहे. काही लोक आहेत, जे इतरांची जाणीवपूर्वक काहीतरी उद्देशाने कॉपी करतात. पण, माझ्या बाबतीत बोलायचे, तर अमिताभ बच्चन यांची उंची, बोलण्याची पद्धत, शरीरयष्टी अगदी माझ्यासारखीच आहे. त्यामुळे मी फक्त एवढंच म्हणेन की, अडीच तास कोण कोणाची कॉपी करू शकत नाही.”

याआधी ‘हिंदी रश’ला दिलेल्या एका मुलाखतीतही मुकेश खन्नांनी एक किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की, मी एका जाहिरातीचे शूटिंग करीत होतो. एक माणूस माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की, जर अमिताभ बच्चन यांनी ही जाहिरात पाहिली, तर ते म्हणतील हा माझी नक्कल करीत आहे. मी त्या माणसाला म्हणालो की, तू वेडा आहेस का? ते असे का बोलतील? पण, त्या व्यक्तीचे बोलणे माझ्या लक्षात राहिले.

पुढे ते म्हणाले की, लोक मला म्हणतात की मी स्वत:मध्ये गुंतलेला आणि भूतकाळात अडकलेली व्यक्ती आहे. मुकेश खन्ना याबद्दल अधिक बोलताना म्हणाले, “लोक मला म्हणतात की, मी भीष्म आणि शक्तिमान या भूमिकांमध्ये अडकलो आहे. त्यापुढचा विचार मी करीत नाही. पण, मी त्या पात्रांचा विचार का करू नये? मी ती पात्रे निर्माण केली आहेत. त्या पात्रांना मी चेहरा दिला आहे. मी त्या उत्तम भूमिका साकारल्या आहेत आणि त्यासारख्याच दुसऱ्या भूमिका करण्याची माझी इच्छा नाही. पूर्वी मला तशी महत्त्वाकांक्षा होती; आता ती नाही.”

दरम्यान, महाभारत या मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर मुकेश खन्ना यांनी शक्तिमान या मालिकेची निर्मिती केली. १९९७ ते २००५ या काळात शक्तिमान हा कार्यक्रम प्रसारित झाला. सध्या मुकेश खन्ना यांचे स्वत:चे यूट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवर बॉलीवूडमधील अनेक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या जातात.