‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शनापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ५ दिवस उलटून गेले तरी हे वाद काही कमी होताना दिसत नाहीयेत. या चित्रपटाला प्रेक्षक तर विरोध करत आहेतच शिवाय याला एक राजकीय वळण देखील मिळालं आहे. सगळ्याच स्तरातून चित्रपटावर बंदी घालायची मागणी केली जात आहे. प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी आदिपुरुषाला रामायणाचा अपमान म्हणत यावार टीका केली तर आता त्यांनी सैफ अली खानच्या भूमिकेबद्दलही भाष्य केलं आहे.
याआधीही मुकेश खन्ना यांनी या चित्रपटावर टीका केली होती. एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत मुकेश खन्ना म्हणाले, “आदिपुरुष हा सध्याच्या युगातील सर्वात विनोदी चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे आपला पवित्र ग्रंथ वाल्मिकी रामायणाचा घोर अपमान आहे. सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाला परवानगी कशी दिली? प्रेक्षक या लोकांना माफ करतील का? या सगळ्यात महागड्या चित्रपटाला प्रेक्षकवर्ग नक्की फ्लॉफ ठरवेल.”
आणखी वाचा : ‘आदिपुरुष’च्या अडचणीत आणखी वाढ; ‘All India Cine workers Aassociation’कडूनही चित्रपटावर बंदी घालायची मागणी
आता नुकतंच त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सैफ अली खानच्या भूमिकेवर टीका केली आहे. ते म्हणाले, “रावण भयानक दिसू शकतो, पण तो चंद्रकांतामधील शिवदत्त-विश्वरूप सारखा कसा काय दिसू शकतो? चित्रपटातील रावणाचं सादरीकरण फारच विनोदी झालं आहे. जेव्हा चित्रपटाची घोषणा झाली होती तेव्हा सैफने रावण हे पात्र वेगळ्या पद्धतीने साकारायचं वक्तव्य केलं होतं. मी तेव्हादेखील म्हणालो होती की, महाकाव्यातील पात्रांमध्ये बदल करणारे तुम्ही कोण?”
पुढे ते म्हणाले, “ओम राऊतलाही रावणासाठी सैफ अली खानलाच का घ्यावंसं वाटलं, याहून उत्तम पर्याय इंडस्ट्रीमध्ये नाहीयेत का? या चित्रपटातील सैफ रावण नव्हे तर तस्करी करणारा गुंड वाटतोय.” आदिपुरुष हा चित्रपट एक तमाशा आहे असंही मुकेश खन्ना म्हणाले होते. सोमवारपासूनच या चित्रपटाच्या कमाईमध्ये कमालीची घसरण बघायला मिळाली आहे.
आदिपुरुष चित्रपटात प्रभासने प्रभू श्रीराम यांची, क्रिती सेनॉनने माता सीतेची, सैफ अली खानने रावणाची व देवदत्त नागे याने हनुमानाची भूमिका साकारली आहे.