चित्रपटसृष्टीतील महानायक, बीग बी अशी ज्यांची जगभर ओळख आहे ते म्हणजे अमिताभ बच्चन होय. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी बॉलीवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. जगाच्या कानाकोपऱ्याच त्यांचे लाखो करोडो चाहते आहेत. मात्र त्यांच्याही आयुष्यात असा काळ होता, ज्यावेळी त्यांना काम मिळणे बंद झाले होते, दिवाळखोरीचा सामना त्यांना करावा लागला होता. एक वेळ अशी आली की त्यांनी स्वत:च एका दिग्दर्शकाला काम आहे का म्हणून विचारले. ते दिग्दर्शक म्हणजे मेहुल कुमार हे आहेत.
फ्रायडे टॉकीज या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयी बोलताना एक आठवण सांगितली आहे. ते म्हणतात, ” रंगीला म्युझिक लॉन्चवेळी अमितजीदेखील त्याठिकाणी आले होते. मला ते भेटून म्हणाले, तुमच्याकडे कोणती नवीन स्क्रिप्ट आहे का? मी विचारले, ‘कोणासाठी?’ त्याने उत्तर दिले, ‘माझ्यासाठी, दुसरे कोण? त्यावेळी मी त्यांना म्हटलं माझ्याकडे त्याच्यासाठी काहीतरी आहे. दुसऱ्या दिवशी मला त्यांच्या ऑफीसमधून फोन आला आणि त्यांनी त्या लॉन्चवेळी केलेल्या विनंतीची आठवण करुन दिली, त्यावेळी आम्ही बैठकीची वेळ ठरवली. बैठकीमध्ये मी त्यांना कथा सांगितली ती त्यांना आवडली आणि अशाप्रकारे मृत्यूदाता चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. पुढच्या सहा महिन्यात आम्ही चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण या चित्रपटामुळे अमिताभ बच्चन इंडस्ट्रीमध्ये परत आले आणि मला आनंद आहे की मी हा चित्रपट दिग्दर्शित केला. ते पुढे म्हणतात की, मी राज कपूर यांनादेखील इंडस्ट्रीमध्ये परत आणणारा चित्रपटदेखील दिग्दर्शत केला होता. याबरोबरच, अमिताभ बच्चन यांनी यश चोप्रा यांना काम मागितल्याची गोष्ट प्रसिद्ध आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन नुकतेच ‘कल्की:२८९८ एडी’ या चित्रपटात भूमिका निभावताना दिसले होते. त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. ‘कल्की: २८९८ एडी’ हा चित्रपट बॉक्सऑफीसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हसन, दुलकिर सलमान, मृणाल ठाकूर हे कलाकार अभिनय करताना दिसले होते. अमिताभ बच्चन यांनी १९६९ सात हिंदूस्तानी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘शोले’, ‘दीवार’ , ‘कभी खुशी कभी गम’, ‘सूर्यवंशम’, ‘कूली’, ‘डॉन’, ‘अग्नीपथ’, ‘पा’, ‘पिंक’, ‘पिकू’ असे एकापेक्षा एक चित्रपटातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत योगदान दिले आहे.