वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात कथितरित्या सहभागी असलेल्या दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे.
‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, या दोघांना नवी मुंबई परिसरातून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी या दोघांची चौकशी केली जाईल. दरम्यान, या दोघांआधी या घटनेत वापरलेल्या दुचाकीच्या मालकाचा पोलिसांनी शोध घेतला. या घटनेत हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी पनवेलमधील एका व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली होती.
गुन्हे शाखेने तपास करत या दुचाकीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. ही दुचाकी आपण काही दिवसांपूर्वी विकल्याचं त्याने म्हटलं होतं. हल्लेखोरांनी ही दुचाकी सलमान खानच्या घरापासून थोड्या अंतराजवळ असलेल्या चर्चजवळ सोडून दिली होती, नंतर ते ऑटोने वांद्रे स्थानकावर पोहोचले व तिथून ते लोकलने गेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.
घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानची पहिली पोस्ट, व्हिडीओ केला शेअर
गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेले दोघेही संशयित आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून या घटनेतील दोन हल्लेखोरांची ओळख पटवली आहे, आता ताब्यात घेतलं ते दोघे सीसीटीव्हीत हल्लेखोर आहेत की नाही, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.