Saif Ali Khan: बॉलीवूड अभिनेता व करीना कपूरचा पती सैफ अली खान याच्यावर मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील घरात हल्ला झाला. मध्यरात्री अडीच वाजता दरोडेखोराने घरात घुसून मोलकरणीशी वाद घातला. त्यानंतर झालेल्या झटापटीत सैफ गंभीर जखमी झाला आहे. सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला, त्याने त्याच्या घरात काम करणाऱ्या गृहसेविकेबरोबर वाद घातला. नंतर सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने सैफवर हल्ला केला. या घटनेत सैफ जखमी झाला आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
हेही वाचा – मोठी बातमी! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्रेतील घरात मध्यरात्री घडली घटना
झोन ९ चे डीसीपी दीक्षित गेडाम म्हणाले, “अभिनेता सैफ अली खानच्या घरात अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली. सैफ व घुसखोर यांच्यात झटापट झाली. या घटनेत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.”
सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांची प्रतिक्रिया
सैफ अली खान या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याला पहाटे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफच्या मानेला व मणक्याला जखमा झाल्या आहेत. “सैफवर त्याच्या घरात अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्याला पहाटे साडेतीन वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं. त्याला सहा जखमा झाल्या आहेत, त्यापैकी दोन जखमा खोल आहेत. एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे. आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत,” असं लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ निरज उत्तमानी म्हणाले. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच सैफच्या प्रकृतीबद्दल जास्त माहिती देता येईल, असंही डॉ. उत्तमणी यांनी सांगितलं.