शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात मध्यरात्री दोन तरुण घुसल्याचा प्रकार घडला. २ मार्चच्या मध्यरात्री दोन तरुण सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत भिंतीवरून उडी घेत शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यामध्ये शिरले. हे दोघेही ‘मन्नत’च्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. घरी सुरक्षा रक्षक असतानाही ही घटना घडली होती. या प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली.
इतकंच नव्हे तर हे दोघे तब्बल ८ तास शाहरुख खानच्या मेकअप रूममध्ये त्याची वाट बघत होते. पोलीसांनी त्यांना अटकही केली. त्यानंतर दोघांची १०००० रुपये देऊन जामीनावर सुटकादेखील झाली. तरी अजूनही हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. ‘ईटाइम्स’ या माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार आता मुंबई पोलिसांनी शाहरुख खानला त्याच्या बंगल्याचे सिक्युरिटी ऑडिट करून घेण्याचा सल्ला दिल्याचं वृत्त समोर येत आहे.
आणखी वाचा : सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर कधी आणि कुठे होणार अंत्यसंस्कार? कुटुंबियांनी दिली चाहत्यांना माहिती
या वृत्तानुसार शाहरुखच्या बंगल्यातील काही गोष्टी चोरीला गेल्या आहेत की नाहीत याची तपासणी करण्यासाठी आणि एकूणच सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी हे सिक्युरिटी ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. वांद्रे पोलिसांनी या दोन तरुणांची चौकशी आणि तपासणीही केली होती, त्यांच्याकडे काहीच संशयास्पद आढळले नसून ते केवळ त्यांच्या लाडक्या स्टारच्या भेटीसाठी घरात शिरले होते.
शाहरुखचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे आणि यामुळेच भविष्यात शाहरुख आणि त्याचा परिवाराला पुन्हा कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठीच हे सिक्युरिटी ऑडिट करून घेण्यात येणार आहे. शाहरुख खानने गेल्याच महिन्यात तब्बल ४ वर्षांनी ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. वेगवेगळे रेकॉर्ड मोडत ‘पठाण’ने बरेच विक्रम रचले आहेत. आता शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी ‘डंकी’ आणि ‘जवान’ या दोन चित्रपटांसाठी उत्सुक आहेत.