‘स्त्री २’, ‘गदर २’, ‘बाला’, ‘वेलकम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत अभिनेते मुश्ताक खान यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. त्यांच्या सहज अभिनयाने ते प्रत्येक भूमिका चोख साकारत कायम प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. अशातच आता मुश्ताक खान सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. एका प्रसिद्ध चित्रपटात काम केल्याचा अनुभव त्यांनी नुकताच शेअर केला आहे, परंतु त्यांच्या या वक्तव्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
मुश्ताक खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. परंतु, त्यांनी ‘वेलकम’ चित्रपटात साकारलेली बल्लूची भूमिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. २००७ साली आलेल्या ‘वेलकम’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, नाना पाटेकर, कतरिना कैफ, अनिल कपूर यांसारखी दिग्गज मंडळी पाहायला मिळतात.
याच चित्रपटातील मुश्ताक यांचा ‘मेरी एक टांग नकली है और मैं हॉकी का बहुत बडा प्लेअर हूं’ हा संवाद आजही तितकाच प्रसिद्ध आहे. परंतु, त्यांचा हा संवाद किंवा ही भूमिका जरी मोठ्या प्रमाणात गाजली असली तरी या चित्रपटाबद्दल बोलताना त्यांनी काही खुलासे केले आहेत. चित्रपटाच्या शूटिंगबद्दल बोलताना ते म्हणाले की, “चित्रपटात काम करण्याआधी आमचा करार होतो, तेव्हा किती दिवसांचं शूटिंग असतं हे आम्हाला सांगितलं जातं आणि त्यावरून आम्ही आमचं मानधन ठरवतो. जर २०-२५ दिवसांचं शूटिंग असेल तर त्यानुसार आम्ही पैसे घेतो. पण, २५ दिवस शूटिंग केल्यानंतर जेव्हा १० दिवसांचं शूटिंग वाढवलं जातं आणि त्यानंतर पुन्हा १५ दिवसांचं शूटिंग वाढवलं जातं; पण पैसे वाढत नाहीत हे मला पटत नाही. मी त्यांना म्हटलं हे चुकीचं आहे, पैसेपण वाढवून द्या”.
‘वेलकम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा हा किस्सा सांगताना ते पुढे म्हणाले, ”अक्षय कुमारच्या स्टाफलाही माझ्यापेक्षा जास्त पैसे मिळत होते. याचं कारण असं होतं की, आमच्याबरोबर त्यांनी एक करारा केला होता, ज्यामध्ये एक ठराविक रक्कम आम्हाला मिळणार होती. समजा करार करताना जर एक लाख इतकी रक्कम ठरवली असेल, तर मग २० दिवस काम असो की २५ दिवस पैसे ठरलेल्या करारानुसारच मिळणार. पण, अक्षय कुमारच्या स्टाफला मात्र पर डेच्या हिशोबाने पैसे दिले गेले. तुम्ही फक्त कल्पना करा, जर आम्हालाही पर डेच्या हिशोबाने पैसे मिळाले असते तर आम्ही किती पैसे कमवले असते,” असं म्हणत त्यांनी त्यांचा हा अनुभव सांगितला आहे.”