Stree 2 Actor Mushtaq Khan Kidnapping : प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पालच्या अपहरणाची घटना ताजी असतानाच आता ‘स्त्री २’ फेम अभिनेता मुश्ताक खान याचंही अपहरण करून त्याच्याकडून २ लाखांहून अधिक रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याच्या बहाण्याने मुश्ताकचं अपहरण करण्यात आलं होतं. याबद्दल त्याचा बिझनेस पार्टनर शिवम यादवने ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना माहिती दिली आहे.
२० नोव्हेंबरला मेरठमध्ये एका पुरस्कार सोहळ्यासाठी मुश्ताकला ( Mushtaq Khan ) बोलवण्यात आलं होतं. यासाठी त्याला मानधनातील काही रक्कम आधीच देण्यात आली होती. याशिवाय विमानाची तिकिटं देखील पाठवली होती. जेव्हा अभिनेता दिल्लीत उतरला तेव्हा त्याला कारमध्ये बसण्यास सांगितलं आणि दिल्लीबाहेर बिजनौरजवळ कुठेतरी नेण्यात आलं.
हेही वाचा : आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
मुश्ताकची कशी झाली सुटका?
शिवमने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या माहितीनुसार, मुश्ताकची ( Mushtaq Khan ) गाडी मेरठऐवजी बिजनौरच्या दिशेने वळवण्यात आली आणि याठिकाणी अपहरणकर्त्यांनी मुश्ताक खानला तब्बल १२ तास डांबून ठेवलं होतं. याशिवाय त्याच्याकडे १ कोटींची खंडणी मागितली. पण, अभिनेता एवढी मोठी रक्कम देऊ शकला नाही. जवळपास १२ तास त्यांनी मुश्ताकचा छळ केला, अखेरीस अपहरणकर्त्यांनी त्याच्या मुलाच्या खात्यातून २ लाखांहून अधिक रुपये मोबाइल फोनवरून स्वत:च्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. पैसे मिळाल्यानंतर त्यांनी मद्यपानाची पार्टी केली. आरोपी मद्यधुंद अवस्थेत आहेत हे लक्षात येताच मुश्ताकने तेथून पळ काढला. मुश्ताकने सकाळची अझान ऐकली तेव्हा त्याला समजलं की, तो एका मशिदीजवळ आहे, त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांची मदत घेतली आणि अभिनेता पुढे पोलिसांची मदत घेऊन घरी परतला.
“मुश्ताक सर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या धक्कादायक प्रकरणामुळे हादरुन गेलं होतं. बिजनौर पोलीस ठाण्यात अभिनेत्याच्या वतीने मी एफआयआरही दाखल केला आहे. आमच्याकडे फ्लाइटचे पुरावे आहेत. तिकीट, बँक स्टेटमेंट आणि विमानतळावरचं सीसीटीव्ही फुटेज या सगळ्या गोष्टींच्या आधारे मला वाटतं पोलिसांची टीम नक्कीच गुन्हेगारांना पकडेल.” असं शिवम यादवने सांगितलं आहे.
हेही वाचा : Pushpa 2: ‘पुष्पा २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत भारताचा क्रिकेटपटू? व्हायरल फोटोंमागचं काय आहे सत्य?
शिवम पुढे म्हणाला, “आम्हाला आधी या प्रकरणाची काहीच माहिती नव्हती. मुश्ताक सर परत आल्यावर आम्ही आमच्या जवळच्या काही मित्रांबरोबर याबाबत चर्चा केली होती. मात्र, जेव्हा सुनील पालचं प्रकरण मीडियामध्ये आलं, तेव्हा त्यांनी आम्हाला सविस्तर याबद्दल सांगितलं. दोन प्रसिद्ध व्यक्तींना अशा घटनांचा सामना करावा लागणं हे खूपच धक्कादायक आहे.”
दरम्यान कोतवाली शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरण, ओलीस ठेवणं आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या टोळीचा शोध घेत आहेत. मुश्ताकच्या ( Mushtaq Khan ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर तो यावर्षी ‘स्त्री २’मध्ये झळकला होता. या घटनेनंतर अभिनेत्याला प्रचंड मोठा धक्का बसला आहे.