A R Rahman Copyright Allegations: संगीत क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवणारे लोकप्रिय संगीतकार म्हणजे ए.आर. रेहमान. आजवर त्यांनी आपल्या आवाजाने आणि संगीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. संगीत क्षेत्रात अत्यंत अदबीनं ए. आर. रेहमान यांचं नाव घेतलं जात. पण, या प्रसिद्ध संगीतकारावर कॉपीराइट उल्लघंनाचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने रेहमान यांना २ कोटींचा दंड ठोठावला आहे.

ए. आर. रेहमान आणि प्रोडक्शन कंपनी मद्रास टॉकीजवर गाणं चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘पोन्नियन सेलवन २’ चित्रपटातील गाणं ‘वीरा राजा वीरा’ गाणं कॉपीराइटच्या कचाट्यात अडकलं आहे. शास्त्रीय गायक फैयाज वसीफुद्दीन डागर यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर हा वाद समोर आला आहे. त्यांनी न्यायालयात दावा केला की, ‘वीरा राजा वीरा’ हे गाणं त्याचे वडील नासिर फैयाजुद्दीन डागर आणि काका झहीरुद्दीन डागर यांनी सादर केलेल्या ‘शिव स्तुती’ सारखेच आहे. त्यांनी आरोप केला की, गाण्याचे सूर आणि भाव ‘शिव स्तुती’ मधून चोरली केले आहेत. परंतु, डागर कुटुंबाला कोणतेही श्रेय दिलं नाही.

फैयाज वसीफुद्दीन डागर यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटलं की, ‘वीर राजा वीरा’ हे केवळ ‘शिव स्तुती’पासून प्रेरित नाही तर त्याच्या रचनेचे सुधारित रूप आहे. न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांनी स्पष्टपणे सांगितलं, “गाण्यात शास्त्रीय रचना वापरली गेली आहे. परंतु त्याच्या मूळ संगीतकारांना श्रेय देण्यात आलं नाही किंवा त्याची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे गाणं आणि चित्रपटाच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर डागर बंधूंना श्रेय देणं बंधनकारक असेल, असेही न्यायालयाने निर्देश दिले.

फैयाज डागर यांनी २०२३ मध्ये न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी सांगितलं की, ए. आर. रेहमान यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला होता. परंतु सुरुवातीला रेहमान यांनी कोणत्याही प्रकारची मान्यता दिली नाही. नंतर ते काही प्रमाणात मान्य करण्यात आले, परंतु चर्चेनंतरही कोणताही ठोस तोडगा निघाला नाही.

ए. आर. रेहमान यांची प्रतिक्रिया

त्याचवेळी, ए.आर. रेहमान म्हणाले होते की, ‘शिव स्तुती’ ही पारंपारिक ध्रुपद शैलीची रचना आहे, जी सार्वजनिक क्षेत्राचा भाग आहे. त्यांनी असेही सांगितले की ‘वीरा राजा वीरा’ ही एक मूळ रचना आहे, जी आधुनिक संगीत तंत्रे आणि २२७ लेअरचा वापर करून तयार केली गेली आहे, जी पारंपारिक भारतीय संगीतापेक्षा वेगळी आहे. तथापि, न्यायालयाने रेहमान यांचा युक्तिवाद फेटाळून लावत हा आदेश दिला आहे.