सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपट प्रदर्शित होताच काही लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली. राजकीय संघटनांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत होती. चित्रपटाची कथा धर्मांतर केलेल्या चार महिलांची आहे, ज्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.
एकीकडे काही लोक या चित्रपटाला प्रचंड विरोध करीत आहेत, तर दुसरीकडे या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. एकही स्टार नसलेला हा चित्रपट २०० कोटींच्या कमाईचा टप्पा लवकरच गाठणार आहे. पश्चिम बंगालमधून या चित्रपटाला बराच विरोध झाला. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही या चित्रपटाला बऱ्यापैकी विरोध झाला. ब्रिटनमध्ये सुरुवातीला या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर १९ मे रोजी हा चित्रपट ब्रिटनमध्ये प्रदर्शित करण्यात आला.
आणखी वाचा : ६० वर्षीय शाहरुख खानच्या चाहतीने व्यक्त केली शेवटची इच्छा; म्हणाली “मृत्यूआधी मला… “
आता याच ब्रिटनमधील बर्मिंगहम शहरातील मल्टीप्लेक्समध्ये एका मुस्लिम कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुस्लिम तरुणाने त्या चित्रपटगृहात ‘द केरला स्टोरी’चा शो सुरू असताना मध्येच उठून या चित्रपटाला विरोध करायला सुरुवात केली. या तरुणाचे नाव शकिल अफसर आहे, जोरजोरात ओरडत आणि घोषणा देत त्याने या चित्रपटाचा विरोध करायला सुरुवात केली. ‘डेली मेल’ या साईटने हा व्हिडीओ लोकांसमोर आणला.
या व्हिडीओमध्ये हा तरुण ‘द केरला स्टोरी’ला बीजेपी आरएसएस प्रोपगंडा असल्याचं म्हणताना पाहायला मिळत आहे. शिवाय ज्या चित्रपटगृहात याचं स्क्रीनिंग सुरू होतं त्या चित्रपटगृहाविरोधातही त्याने बरंच भाष्य केलं. इतकंच नाही तर या व्हिडीओमध्ये हा तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याबाबतीतही अभद्र शब्द बोलताना दिसत आहे. “हा चित्रपट खोटा आहे, आम्ही हे सहन करणार नाही, हा चित्रपट आपल्यात फुट पाडण्यासाठी काढण्यात आला आहे.” असं हा तरुण जोरजोरात चित्रपटगृहात ओरडताना दिसत आहे.
सर्वप्रथम चित्रपटगृहात उपस्थित असलेले प्रेक्षक याकडे दुर्लक्ष करत होते, पण बराच वेळ याबद्दल कुणीच कारवाई करत नसल्याने नंतर प्रेक्षकही उठून या माणसाशी हुज्जत घालू लागले. “हा एक इस्लामोफोबिक चित्रपट आहे, तुम्हाला हा चित्रपट पाहताना लाज कशी वाटत नाही?” असं हा तरुण म्हणू लागला तेव्हा मात्र प्रेक्षकांनी उठून याला विरोध करायला सुरुवात केली.
काही वेळात चित्रपटगृहाच्या मालकांनी तिथे येऊन त्या तरुणाला बाहेर घेऊन जाऊ लागले तेव्हा मात्र हा तरुण जाताना ‘फ्री काश्मिर’च्या घोषणा देताना बाहेर पडत आहे. बाहेर पडताना त्याच्याबरोबर अजूनही काही तरुण होते जे ‘द केरला स्टोरी’च्या या शोमध्ये असाच धुडगूस घालणार होते असं त्यांनी कॅमेरासमोर सांगितलं.