आज शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. सगळीकडे याच चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. ‘जवान’ची इतकी तुफान क्रेझ आहे की नागपूर पोलिसांनाही त्याची भुरळ पडल्याचं दिसतंय. त्याचं कारण म्हणजे नागपूर पोलिसांनी केलेलं ट्वीट होय.
कसा आहे शाहरुख खानचा बहुप्रतिक्षीत ‘जवान’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले…
नागपूर शहर पोलिसांनी त्यांच्या अधिकृत X (ट्विटर) हँडलवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचे पोस्टर आहे ज्यामध्ये शाहरुख खान तो चित्रपटात साकारत असलेल्या ५ वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहे. ‘वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्ससाठी वेगवेगळे पासवर्ड सेट करणं असं असतं,’ असं त्या पोस्टरमध्ये लिहिलं आहे.
या पोस्टरबरोबर नागपूर शहर पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “जेव्हा तुम्ही असे पासवर्ड ठेवता, तेव्हा एकही कोणताही फ्रॉडस्टर टिकू शकत नाही.” नागपूर पोलिसांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. जवानची क्रेझ पाहता नागपूर पोलिसांनी शक्कल लढविली आणि त्याद्वारेच सायबर क्राइमविरोधात जनजागृती केली आहे.
नागपूर पोलिसांच्या या ट्वीटवर युजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. ‘खूप चांगलं ट्वीट’, ‘नागपूर पोलिसांबद्दल आदर आहे’, ‘नागपूर पोलिसांनी सायबर सुरक्षिततेबद्दल केलेला मेसेज फार चांगला आहे’, अशा कमेंट्स युजर्स यावर करत आहेत.