‘सैराट’, नाळ, ‘फँड्री’, ‘झुंड’सारखे आशयघन चित्रपट देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. झी स्टुडिओज’ आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ हा त्यांचा चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नागराज मंजुळे एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका निभावत आहेत. नुकतंच नागराज यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना त्यांच्या ‘झुंड’ या चित्रपटाबद्दल भाष्य केलं.
नागराज यांच्या ‘झुंड’मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासारखा स्टार असूनही चित्रपट म्हणावा तसा चालला नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. शिवाय ‘झुंड’ हा चित्रपट का चालला नाही यामागील काही महत्त्वाची कारणंही त्यांनी सांगितली आहेत. समीक्षकांनी चित्रपटाची प्रशंसा करूनही चित्रपटगृहात त्यासाठी फारशी गर्दी झाली नाही ही खंत नागराज यांनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केली.
आणखी वाचा : तब्बल सात महीने ‘RRR’चा जपानच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; चित्रपटाने रचला ‘हा’ नवा विक्रम
नागराज म्हणाले, “हे खरं आहे की झुंडला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, तो काळच वेगळा होता तेव्हा कोविडचा प्रभाव होता. याबरोबरच चित्रपटाचं नीट प्रमोशनही झालं नाही असं मला वाटतं. जर लोकांनी हा चित्रपट पाहिला असता तर तो त्यांना नक्कीच आवडला असता, पण तितक्या प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचलाच नाही. त्यावेळी सगळेच एका मोठ्या संकटाचा सामना करत होते. बरेच चित्रपट त्यावेळी एकापाठोपाठ एक प्रदर्शित होत होते. त्या आठवड्यात ३ मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते त्याचाही यावार परिणाम झाला असावा.”
आणखी वाचा : आवडता ‘आयपीएल’ संघ कोणता MI की CSK? गौतमी पाटीलने उत्तर देत केला आवडत्या खळाडूबद्दलही खुलासा
पुढे नागराज म्हणाला, “असं नाही की कोविडदरम्यान चित्रपट प्रदर्शित झाले आणि ते चाललेच नाहीत, बरेच चित्रपट चालले. झुंडने केलेली कमाई पाहता त्याने चांगलीच कामगिरी केली पण नक्कीच या चित्रपटाला आणखी उत्तम प्रतिसाद मिळाला असता असं मला नक्की वाटतं.” नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट विजय बारसे यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. यात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. आता नागराज मंजुळे यांच्या ‘घर बंदुक बिरयानी’ या चित्रपटाची सगळे आतुरतेने वाट बघत आहेत. यात नागराज यांच्यासह सयाजी शिंदे, आकाश ठोसर हे मुख्य भूमिकेत आहेत.