अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या लग्नासाठी राजकीय, सामाजिक, मनोरंजन, क्रीडा या क्षेत्रातील मंडळी एकाच ठिकाणी जमली होती. याठिकाणी अनेक कलाकारांनी एकमेकांच्या भेटी घेतल्या. मराठमोळी अभिनेत्री व तेलुगू सुपरस्टार महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) हिने सुधा मूर्ती (Sudha Murty) यांची भेट घेतली. तिने फोटो शेअर करत तिचा भेटीचा अनुभव सांगितला.
नम्रता शिरोडकरने नुकतीच मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला हजेरी लावली होती. रेखा, नयनतारा, ऐश्वर्या राय आणि ज्योतिका यांच्याबरोबरचे अनेक फोटो ती तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. आता नम्रताने लेखिका व राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. फोटो नम्रताने सुंदर ऑफ व्हाईट ड्रेस घातल्याचं पाहायला मिळत आहे, तर सुधा मूर्ती यांनी जांभळ्या रंगाची जरी वर्क असलेली साडी नेसली आहे.
नम्रताने लिहिलं सुंदर कॅप्शन
नम्रता शिरोडकरने सुंदर फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “मी हा क्षण कधीच विसरणार नाही…या बुद्धिमान महिलेबद्दल खूप काही ऐकलं होतं आणि त्यांना भेटल्यावर जे ऐकलं होतं त्यावर माझा विश्वास बसला आहे. कमालीच्या उत्साही आहेत. इतरांना त्या भरभरून प्रेम देतात! त्यांनी माझ्या आजीचं कौतुक केलं. इतकंच नाही तर माझे पती आणि माझ्या लेकीचंही कौतुक केलं, या आठवणी आयुष्यभर जपण्यासारख्या आहेत.”
नम्रताच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट्स करून या फोटोचं कौतुक करत आहेत. अनेकांनी सुधा मूर्ती यांचंही कौतुक केलं आहे. चाहते यावर हार्ट इमोजी शेअर करत आहेत. नम्रताच्या बहिणीने माझं स्वप्न पूर्ण झालं अशी कमेंट या पोस्टवर केली आहे.
दरम्यान, अनंत व राधिकाच्या लग्नाचे सलग तीन दिवस कार्यक्रम होते व या कार्यक्रमात पाहुण्यांची मांदियाळी होती. फक्त हिंदी सेलिब्रिटीच नाही तर दाक्षिणात्य, मराठी व भोजपुरी कलाकारांनाही रिसेप्शनसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. आशीर्वाद सोहळ्याला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली होती. त्यांनी राधिका व अनंतला आशीर्वाद दिले होते. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही कुटुंबाबरोबर उपस्थित होते. शरद पवारही या कार्यक्रमाला हजर राहिले.