अभिनेते नाना पाटेकर म्हणजे एक दिलखुलास आणि हरहुन्नरी व्यक्तीमत्व. आत्तापर्यंत नाना पाटेकरांनी विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १ जानेवारी १९५१ हा नाना पाटेकरांचा जन्मदिवस. नाना पाटेकरांना आजही लोक ए नाना, ए नान्या अशीच हाक मारतात आणि ते जाहीर सभेत, जाहीर भाषणात त्या हाकेला प्रतिसादही देतात. आज मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या या कलावंताचा खास किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नाना पाटेकर हे एक उत्तम कुक आहेत
आपला नाना पाटेकर असं वाटणारा हा नाना त्याच्या अंगी नाना कळा बाळगून आहेच. त्यातलाच त्याचा एक उत्तम गुण म्हणजे स्वयंपाक. नाना पाटेकर उत्तम स्वयंपाक बनवतात. उत्तम स्वयंपाक तयार करुन तो मित्रांना खाऊ घालण्याचा छंद नाना पाटेकरांना आहे. अभिनयाचं खणखणीत नाणं अशी त्यांची ओळख आहे.
वैविध्यपूर्ण सिनेमांमध्ये काम
नाना पाटेकरांनी क्रांतिवीर, परिंदा, अब तक छप्पन, प्रहार, अंकुश, सलाम बॉम्बे, टॅक्सी नंबर ९२११, यशवंत, वजुद, तिरंगा, वेलकम, गुलाम ए मुस्तफा, ब्लफ मास्टर या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये विविधरंगी भूमिका केल्या आहेत. नाना पाटेकर जितक्या सहजतेने गंभीर अभिनय करतात तितक्याच सहजतेने विनोदही करतात. नाना पाटेकरांचा परिंदामधला अन्ना जितका भावतो, जितका त्याचा राग येतो. तितकाच नाना पाटेकरांचा वेलकममधला उदय भाई गुदगुल्या करतो आणि हसवतो. खामोशी या सिनेमात तर त्यांच्या अभिनयाचा कस लागला आहे. कारण या चित्रपटात त्यांच्या तोंडी संवादच नाही.
माधुरी दीक्षितसाठी कविता म्हटली होती म्हणून लक्षात आहे..
नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांचा वजुद हा सिनेमा चांगलाच गाजला होता. त्यातली कैसे बताऊं मै तुम्हे मेरे लिये तुम कौन हों.. ही कविता तर नानांनीच म्हणावी आणि आपण ऐकत रहावं अशी. एका जाहीर मुलाखतीत नाना पाटेकरांनी या कवितेची खासियत सांगितली होती. “माधुरीसाठी कविता म्हटली होती त्यामुळे तशीच लक्षात राहिली. आता काय सगळाच भूतकाळ झाला” असं नाना पाटेकर म्हणाले होते. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. अगदी असाच आहे तो हमीदाबाईची कोठी नाटका दरम्यान झालेल्या नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांच्या मैत्रीचा किस्सा.
काय म्हणाले होते नाना पाटेकर?
“अशोकने मला वारंवार पैशांची मदत केली आहे. आम्ही हमीदाबाईची कोठी नाटक करायचो तेव्हा मला ५० रुपये मिळायचे, अशोकला २५० रुपये मिळायचे. जेव्हा नाटकाच्या प्रयोगांदरम्यान वेळ असायचा तेव्हा आम्ही पत्ते खेळायचे. त्यावेळी अशोक (अशोक सराफ) जाणीवपूर्वक पैसे हरायचा. पाच ते दहा रुपये तो हरायचा. मला कळायचं तो मुद्दाम हरतोय, पण मला पैशांची गरज होती त्यामुळे मी ते पैसे घ्यायचो. एकदा गणपतीला पैसे नव्हते आणि फुलांचा खर्च होता. त्यावेळी सकाळी साडेसहा वाजता अशोक फिल्मसिटीला चालला होता. माझ्या घरी आला खिडकीवर टकटक केलं. माझ्या हातात त्याने एक चेक ठेवला, मला म्हणाला १५ हजार बँकेत आहेत तुला पाहिजे ती रक्कम घाल असं म्हणून एक कोरा चेक त्याने मला दिला. मी ३ हजार रुपये काढले होते बँकेतून. त्याने मला त्या पैशांविषयी काहीच विचारलं नाही. काही वर्षांनंतर आम्ही दोघं सावित्री नावाच्या सिनेमात काम करत होतो.त्यावेळी मला पैसे मिळाल्यावर मी त्याला ते दिले. तेव्हा अशोक म्हणाला काय पाटेकर पैशेवाले झाले तुम्ही. त्यावर मी त्याला म्हटलं अरे पैसेच परत करतोय, वेळ नाही परत करु शकत. अशोक कुठेही असला नाटकाचा दौरा वगैरे काहीही असलं की मी त्याचे पाय चेपायचो आणि डोक्याला तेल लावून मालिश करुन द्यायचो. त्यावेळी तो मला पाच रुपये द्यायचा. हल्लीही कुठे भेटला तर मी त्याचे पाय चेपून देतो. त्यावर तो मला म्हणतो ए नाना गाढवा असं करु नकोस.” अशी आठवण नाना पाटेकर यांनी सांगितली होती.
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे दोघंही मिळून नाम फाऊंडेशनचंही काम करतात. एका भाषणात त्यांनी असंही म्हटलं होतं की टीका करणं खूप सोपं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करणंही सोपं आहे मात्र त्यांची विचारसरणी, विचारांचं अनुकरण एक पाऊल जरी करता आलं तर ते महत्त्वाचं आहे. शिवरायांचा पुतळा उभारायचा म्हणजे एक जबाबदारी वाढते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असंही नाना पाटेकरांनी भाषणात सांगितलं होतं.
ओले आले सिनेमा येतोय
नाना पाटेकरांचा ‘ओले आले’ हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. पद्मश्री पुरस्कार मिळाला तेव्हा मला हसू आलं. तो इतका मोठा सन्मान आहे. मी आणि पद्मश्री ही दोन टोकं आहेत. मला का देत आहेत मला वाटलं होतं असं नाना पाटेकर म्हणाले होते. आपण आपलं काम करत राहायचं बाकी सगळ्या गोष्टी घडत राहतात असंही नाना पाटेकर एका मुलाखतीत म्हटलं होतं. पुरस्कार हे मिळतच असतात, ते ठरवणारी चार किंवा पाच मंडळी असणार त्यांच्या खिजगणतीत आपण आहोत तर मिळणार, भांडण असेल तर अजिबात नाही मिळणार अशा गोष्टी असतात असंही मत नाना पाटेकर यांनी म्हटलं होतं. अशा या हरहुन्नरी कलावंताला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!