नाना पाटेकरांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी सेल्फी काढायला आलेल्या एका चाहत्याच्या डोक्यावर जोरात फटका दिल्याचं दिसतंय. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच नाना यांनी चाहत्याला दिलेली वागणूक चुकीची असल्याचं म्हटलं गेलं. अशातच आता नाना यांनीच या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.
नाना पाटेकरांनी सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याच्या डोक्यावर जोरात मारला फटका, व्हिडीओ व्हायरल
नाना पाटेकर म्हणाले, “एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात मी एका मुलाला मारतोय. हा सीन आमच्या चित्रपटाचाच भाग आहे. आम्ही एक रिहर्सल केली होती. त्यात पाठीमागून एक जण म्हणतो ‘ए म्हाताऱ्या टोपी विकायची आहे का?’ मी त्यात टोपी घालून असतो. तो येतो मी त्याला पकडून मारतो आणि ‘नीट वाग, उद्धट बोलून नकोस’ असं म्हणतो. त्यानंतर तो जातो. एक रिहर्सल केली, नंतर दिग्दर्शकाने पुन्हा रिहर्सल करायला सांगितलं. आम्ही सुरू करणार इतक्यात या व्हिडीओत दिसणारा मुलगा तिथे आला. मला माहीत नव्हतं की हा मुलगा कोण आहे, मला वाटलं आमच्या टीममधला आहे. त्यामुळे सीननुसार मी त्याला मारलं आणि माझा डायलॉग म्हटला. नंतर मला कळालं की हा आमच्या टीममधला माणूस नाही. मग मी त्याला बोलवायला जात होतो, पण तो पळून गेला. त्याच्या मित्राने वगैरे हा व्हिडीओ शूट केला असेल.”
पुढे ते म्हणाले, “मी कधीच कुणाला फोटोसाठी नाही म्हटलेलं नाही. मी इथेही हजारो फोटो काढले, तिथे वाराणसीत घाटावर खूप गर्दी असते. हे चुकून झालं, मला माहीत नाही तो कुठून आला, मी आमच्या टीमचा माणूस समजून रिहर्सलचा सीन शूट केला. या व्हिडीओमुळे कोणताही गैरसमज झाला असेल तर मला माफ करा, मी असं कधीच कुणाला मारत नाही, आजपर्यंत मी कधीच असं केलेलं नाही. लोक माझ्यावर खूप प्रेम करतात, त्यामुळे मी असं कृत्य कधीच करणार नाही.”
यावेळी नानांनी गर्दीत शुटिंगचा अनुभवही सांगितला. “मला वाटलं की त्याने उगाच माझा मार खाल्ला, त्यामुळे मी टीमला सांगितलं की त्याला बोलवा मी त्याची माफी मागतो. टीमने त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तो सापडला नाही. तो रिहर्सलच्या मधे शिरला होता, त्यामुळे त्याला वाटलं असेल की हे लोक कदाचित आणखी मारतील, त्यामुळे तो पळून गेला असावा. पण खरंच मला माफ करा मी कधीच असं वागत नाही. घाटावर गर्दी शुटिंग करताना लोक खूप मदत करतात. आम्ही तिथे आणखी १०-१५ दिवस शुटिंग करणार आहोत,” असं नाना पाटेकर म्हणाले.