आपल्या अभिनयाने चित्रपटात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नाना पाटेकरांनी आपल्या सहज अभिनयाने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांतील भूमिका अजरामर केल्या आहेत. ‘क्रांतिवीर’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ यांसारख्या अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. त्याबरोबरच विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘परिंदा’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरला आहे. ‘परिंदा’ या चित्रपटातील नाना पाटेकरांनी केलेल्या अभिनयाने त्यांच्या कारकिर्दीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याचे म्हटले जाते. ‘द इंडियन्स एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, विधू विनोद चोप्रा यांनी ‘सा रे ग म प’च्या मंचावर शूटिंगदरम्यान आमच्या दोघांसाठी गोष्टी तितक्या सहज नसल्याचे वक्तव्य केले आहे.
विधू विनोद चोप्रा अभिनेते नाना पाटेकरांविषयी बोलताना म्हणतात, “मी नानांना ‘पुरुष’ या नाटकात काम करताना पाहिलं होतं. नानांना भेटेपर्यंत मी एक साधा, सभ्य काश्मिरी तरुण होतो. पण, मी नानांना भेटलो आणि सगळंच बदललं. जेव्हा मी नानांना परिंदा या चित्रपटादरम्यान सीनमध्ये दिग्दर्शन करीत होतो, तेव्हा ते मला शिवीगाळ करायचे. ते पाहिल्यानंतर मी त्यांना कसे काय दिग्दर्शन करणार, असा मला प्रश्न पडू लागला. त्यानंतर मीदेखील त्यांना उलट शिवीगाळ करायला सुरुवात केली.” पुढे ते म्हणतात, “चित्रपटात असा एक प्रसंग होता; जो मी नानांना समजावून सांगत होतो. प्रसंग असा होता की, त्याच्या पत्नीचा मृत्यू होतो आणि नानांच्या डोळ्यांत पाणी तरळणार, हे दृश्य मी नानांना समजावून सांगितले. आम्ही दिवसभर शूटिंग करीत असू आणि संध्याकाळ झाली होती. नानांनी सांगितले की, मी थकलो असून घरी जात आहे. मी त्यांना म्हटलं की, जा पण पुढच्या सीनचा खर्च देऊन जा त्यानंतर नानांनी मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. मीही शिवीगाळ केली आणि भांडणात त्यांचा कुर्ता फाडला. आमचे भांडण सुरूच होते, तेवढ्या आमच्या कॅमेरामॅनने शॉट तयार असल्याचे ओरडून सांगितले. मी कॅमेरासमोरुन बाहेर आलो.”
हेही वाचा: ‘क्रिश’मध्ये हृतिक रोशनची भूमिका करणारा बालकलाकार आता ‘या’ क्षेत्रात करतोय काम, व्हिडीओ चर्चेत
चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, त्या दृश्यात नानांनी बनियन घातली आहे. कारण- त्यांचा कुर्ता नुकताच फाटला होता आणि त्यांच्या डोळ्यांतील अश्रू खरे आहेत; जे आमच्या भांडणामुळे त्यांच्या डोळ्यांत तरळले होते. त्यानंतर आम्ही एकमेकांना मिठी मारली. नानांनी मला सांगितले की, या सीनमुळे त्यांच्यावर दडपण आले होते. अशा पद्धतीने ‘परिंदा’ चित्रपट निर्माण झाला”, अशी आठवण विधू विनोद चोप्रा यांनी सांगितली आहे.नाना पाटेकर आणि विधू विनोद चोप्रा यांनी ‘परिंदा’नंतर कधीही एकत्र काम केले नाही. या चित्रपटात माधुरी दीक्षित, अनिल कपूर व जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले आहेत.