ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सध्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाचा किस्सा सांगितला आहे. ‘बाजीराव मस्तानी’मधील एक गाणं नाना पाटेकरांना अजिबात आवडलं नव्हतं त्यामुळे थेट भन्साळींना फोन करून त्यांनी याबाबत विचारणा केली होती.
नाना पाटेकर बॉलीवूड चित्रपटांविषयी सांगताना म्हणाले, “ज्या गोष्टी मला चुकीच्या वाटतात त्या मी स्पष्टपणे सांगतो. एखादा चित्रपट जेव्हा सत्य घटनेवर आधारित असतो, तेव्हा निर्मात्यांनी मूळ कथेची मोडतोड करून आकडेवारीत बदल करू नये. भन्साळींच्या चित्रपटांमध्ये मी असला प्रकार जास्त पाहिला आहे. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटतील मल्हारी गाणं मला अजिबात आवडलं नव्हतं.”
“‘मल्हारी’ गाणं ऐकून मी थेट संजय लीला भन्साळी यांना फोन केला आणि यात “वाट लावली” असा शब्द आहे तो कशासाठी? हा नेमका काय प्रकार आहे? याबाबत विचारणा केली. माझ्या नाराजीबद्दल त्यांना सांगितलं कारण, मला ते गाणं अजिबात आवडलं नव्हतं. ज्या गोष्टी चुकीच्या असतात त्याविषयी वेळोवेळी बोलणं गरजेचं असतं.” असं नाना पाटेकर यांनी सांगितलं.
दरम्यान, ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत्या २८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन व अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.