शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘पठाण’नंतर शाहरुखचा हा सलग दुसरा चित्रपट आहे ज्याने १००० कोटींचा टप्पा पार केला आहे. आता विवेक अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचदरम्यान नाना पाटेकर यांनी एकूणच बॉलिवूडच्या चित्रपटांबद्दल भाष्य केलं होतं. नाना यांचं ते वक्तव्य शाहरुखच्या ‘जवान’बद्दल असल्याचा काही लोकांनी अंदाज लावला.
नाना पाटेकर यांनी ‘जवान’चं नाव न घेताच यावर भाष्य केलं. नाना म्हणाले, “मी नुकताच एक जबरदस्त हीट झालेला चित्रपट पाहिला. मी तो चित्रपट पूर्णपणे पाहू शकलो नाही, परंतु असे चित्रपट चालत आहेत. हे चित्रपट चालतायत म्हणून सतत अशाच प्रकारचे चित्रपट ते लोकांच्या माथी मारत राहणार आणि आपल्याला त्यांच्या बळी पाडणार.” याचबरोबर नाना यांनी नेपोटीजमवरही भाष्य केलं.
आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘डंकी’ची रिलीज डेट बदलणार? प्रभासच्या चित्रपटामुळे निर्मात्यांनी तारीख बदलल्याची चर्चा
आता नाना पाटेकर यांचा सुर बदलल्याचं जाणवत आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’च्या प्रमोशनदरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नाना यांनी वेगळंच वक्तव्य दिलं आहे. शाहरुखबद्दल विचारल्यावर ‘न्यूज १८’शी संवाद साधतांना नाना पाटेकर म्हणाले, “हा अतिशय उत्कृष्ट कलाकार आहे. याचा पहिला चित्रपट ‘राजू बन गया जेंटलमन’ माझ्याबरोबर होता. प्रदर्शित वेगळाच झाला, पण तुम्ही आजही शाहरुखला विचारा मी त्याला पहिल्या दिवशीच बोललो होतो की तो खूप मोठा स्टार होणार आहे. आजही तो जेव्हा भेटतो अगदी तेव्हासारखीच त्याची वागणूक असते. तो मला माझ्या छोट्या भावासारखा आहे, मला त्याच्याबद्दल कशाला प्रॉब्लेम असेल?”
नाना यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होताना दिसत आहे. नाना यांचा टीकेचा सूर बदलल्याचा आरोप काहींनी त्यांच्यावर केला आहे. नाना पाटेकर यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे, तर शाहरुखच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.