Nana Patekar : मराठीसह हिंदी कलाविश्वातील ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी १९७८ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. ‘गमन’ चित्रपटातून ते रुपेरी पडद्यावर झळकले. गेली अनेक दशकं नाना पाटेकर प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. याशिवाय रंगभूमीवर देखील त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. कलाविश्वात एकत्र काम करताना नाना पाटेकरांची अनेक सहकलाकारांबरोबर चांगली मैत्री जमली. नुकत्याच ‘बोलभिडू’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याबद्दल विचारण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्मिता पाटील यांच्याविषयीची आठवण काय आहे? याबद्दल विचारलं असता नाना पाटेकर सांगतात, “स्मितामुळे मी सिनेमात आलो. नाहीतर मी सिनेमात काम करायला तयारच नव्हतो. मी पहिला चित्रपट केला ‘गमन’ तो सुद्धा तिच्याबरोबर केला. ती मला नेहमी म्हणायची तू केलं पाहिजेस नाना… एकावेळी तुला एवढ्या लोकांपर्यंत पोहोचता येईल. तुला कळत नाही…तू केलं पाहिजे नेहमी सांगायची, समजूत काढली. मी तिला उलटं सांगायचो, अगं मी तिथे नाही रमणार…मला त्या नाटकाच्या चौकानात गेल्यावर अगदी राजा झाल्यासारखं वाटतं.”

“स्मितामुळे मी चित्रपट करू लागलो आणि आता असं वाटतं. सिनेमा हे माध्यम इतकं मोठं आहे की, एकावेळी तुम्ही एवढ्या लोकांशी कनेक्ट होता. सत्यजित रे यांचं एक पान त्यांनी प्रकाशित केलं त्यात होतं नाना पाटेकरांबरोबर काम करायचंय असं लिहिलेलं. हे सगळं अवॉर्ड्सपेक्षा मोठं आहे. मला तपन सिन्हांबरोबर काम करण्याचा देखील अनुभव मिळाला.” असं नाना पाटेकरांनी सांगितलं.

स्मिता पाटील यांनी नाना पाटेकरांना दिग्दर्शक रवी चोप्रा यांच्याकडे नेलं होतं. ‘गमन’नंतर त्यांनी ‘आज की आवाज’ मध्ये काम केलं. या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळून नाना पाटेकरांचा बॉलीवूडमधला प्रवास सुरू झाला.

अभिनेता म्हणून कोणतं काम करायचं बाकी आहे?

अभिनेता म्हणून असं कोणतं महत्त्वाचं काम आहे जे तुम्हाला करायचंय याबद्दल सांगताना नाना पाटेकर म्हणाले, “आता जी सामाजिक विसंगती आहे ती दूर करता येईल का? तसे विषय हाताळणं…मुळात जात, धर्म या घरात पाळायच्या गोष्टी आहेत आणि बाहेर रस्त्यावर आलात, घराबाहेर आलात की माझा देव म्हणजे माझा देश अशी धारणा प्रत्येकाची झाली पाहिजे. माझ्यामते देव म्हणजे देश. कारण, माझी माणसं असतील तर मी आहे. आज जर तुम्ही परदेशात गेलात तर, तुमच्या नावापेक्षा इंडियन किंवा भारतीय आहात का? असं विचारलं जातं. हीच आपली ओळख आहे मग तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar recalls smita patil memories and working in the first film of bollywood sva 00