नाना पाटेकर विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. ते चित्रपटात डॉ. बलराम भार्गव यांचे पात्र साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाची नाना पाटेकर यांना ऑफर देण्यापूर्वी आपण जरा घाबरलो होतो, असं विवेक अग्निहोत्री ट्रेलर लाँचच्या वेळी म्हणाले होते. याबाबत नाना पाटेकरांना विचारण्यात आलं. त्यांनी काय उत्तर दिलं ते जाणून घेऊयात.
नाना पाटेकर चिडतात, असं लोकांचं मत का झालंय, याबाबत बोलताना नाना पाटेकर म्हणाले, “कोणी चुकीची गोष्ट बोललं किंवा काही चुकीचं लिहिलं असेल तर मी चिडतो. एक तर तुम्ही मला ती गोष्ट समजावून सांगा किंवा मी म्हणतोय ते समजून घ्या. या दोनपैकी काहीतरी एक करा, असं माझं म्हणणं असतं. तुम्ही मला नाही समजावू शकलात तर मी ते काम करण्यास नकार देईन. तुम्ही दिग्दर्शक आहात, एका कलाकाराला समजावून सांगण्याची तुमची पात्रता असायलाच पाहिजे.”
“मला पद्मश्री पुरस्कार का दिला?” नाना पाटेकरांचा प्रश्न; म्हणाले, “माझ्यासारख्या माणसाला…”
“काहीतरी लिहिलंय, ते तुम्ही समोरच्याला समजावून सांगू शकत नसाल तर नका लिहू. अशा वेळी कोणी तीच ती गोष्ट म्हटली की मी चिडतो. मला एखादी गोष्ट समजली नाहीये, तर ती समजावून सांगा. जी गोष्ट समजतच नाही ती लिहूच नका आणि बोलूही नका. कारण एखादी गोष्ट आपल्यालाच समजत नसेल तर ती साकारणार कशी, ती लोकांना कशी समजावून सांगणार. कारण ती गोष्ट समजावून सांगण्याचं माध्यम आम्ही आहोत, आमचा चेहरा आहे. म्हणजे ती आम्हीच प्रेक्षकांना समजावून सांगायची आहे. तर्कांवर आधारित चित्रपट असेल तर तसं आधीच सांगा,” असं नाना पाटेकर म्हणाले.
दरम्यान, सध्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट करोना काळात लसीच्या निर्मितीवर आधारित आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर बनवण्यात आला आहे. चित्रपटात नाना पाटेकर डॉ. बलराम भार्गव यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्याशिवाय अनुपम खेर, सप्तमी गौडा, पल्लवी जोशी, गिरीजा ओक आणि रायमा सेन हे कलाकारही चित्रपटात आहेत.