दिग्गज बॉलीवूड अभिनेते नाना पाटेकर आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. लवकरच त्यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, यामुळे ते चर्चेत आहेत. जवळपास सहा वर्षांनी ते पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित त्यांचा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
नाना यांना चित्रपटसृष्टीत जवळपास साडेचार दशकं झाली आहेत. १९७८ साली आलेल्या ‘गमन’ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहेत. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी आतापर्यंत अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. इतकंच नव्हे तर २०१३ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. आता ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पद्मश्री पुरस्कार सरकारने का दिला, यामागचं कारण माहीत नसल्याचं वक्तव्य केलं.
प्रेम विवाह करूनही पत्नीपासून वेगळे का राहतात नाना पाटेकर? कोण आहेत त्यांच्या पत्नी? वाचा
बाबा आमटेंचं काम खूप मोठं आहे, त्यांना भारतरत्न मिळायला हवा होता, त्यांची बायोपिक करायला मला आवडेल, असं नाना पाटेकर म्हणाले. त्यानंतर त्यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराबाबत त्यांनी भाष्य केलं. “मला पद्मश्री पुरस्कार मिळाला, पण त्यामागचं कारण मला माहीत नाही. मी काही केलंच नाही, मग पुरस्कार का दिला? खरं तर लोकांनीच हा प्रश्न विचारायला पाहिजे की नानाला पद्मश्री पुरस्कार का दिला? या पुरस्काराचा एक आदर आहे, मग नानासारख्या माणसाला तुम्ही हा पुरस्कार का दिला?” असं ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “जेव्हा कुणालाही भारतरत्न, पद्मश्री, पद्मविभुषण पुरस्कार दिला जातो, तेव्हा त्यामागची कारणंही विचारायला पाहिजे. भारतरत्न का दिला जातो, याचं कारण कदाचित आपल्याला माहीत असेल. कलाकारांसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, खेळाडुंसाठी खेलरत्न पुरस्कार आहे, भारतरत्न ते आहेत ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलंय आणि त्याबदल्यात काहीच घेतलं नाही.”