Chhaava Movie Song : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा येत्या १४ फेब्रुवारीला ‘छावा’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. या सिनेमात विकी कौशल व दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्यासह अनेक मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘छावा’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अभिनेता संतोष जुवेकरची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आता निर्मात्यांनी या सिनेमातल्या पहिल्या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये एका लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्रींची झलक पाहायला मिळत आहे.

‘छावा’ सिनेमातल्या ‘जाने तू’ या गाण्याची पहिली झलक निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केली असून हे संपूर्ण गाणं उद्या ( ३१ जानेवारी ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ए आर रेहमान यांनी या गाण्याच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असून, अरिजित सिंहच्या आवाजात हे गाणं संगीतबद्ध करण्यात आलेलं आहे.

‘जाने तू’ गाण्यातील एका सीनमध्ये महाराणी येसूबाई छत्रपती संभाजी महाराजांचं औक्षण करत असल्याचं पाहायला मिळतं. यावेळी त्यांच्याबाजूला रयतेतील अनेक स्त्रिया स्वागतासाठी सज्ज असतात. यात रश्मिकाच्या बरोबर बाजूला आपल्याला नाना पाटेकरांच्या पत्नी नीलकांती पाटेकर उभ्या असल्याचं पाहायला मिळतंय.

Chhaava Movie Song
‘छावा’ सिनेमात नाना पाटेकर यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर महत्त्वाच्या भूमिकेत ( Chhaava Movie Song )

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’मधून नीलकांती पाटेकर कलाविश्वात पुनरागमन करणार आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच गाण्याच्या टीझरमध्ये त्यांचा लूक पाहता त्या सिनेमात धाराऊंची भूमिका साकारणार असल्याचं समोर येत आहे. धाराऊ या शंभूराजेंच्या दूधआई होत्या. हीच महत्त्वाची भूमिका सिनेमात नीलकांती पाटेकर साकारणार आहेत.

दरम्यान, ‘छावा’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सुद्धा मराठीच आहेत. यापूर्वी त्यांनी विकी कौशलबरोबर ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाच्यावेळी काम केलेलं होतं. लक्ष्मण उतेकर व विकी कौशल या दोघांचा ( दिग्दर्शक-अभिनेता ) ‘छावा’ हा एकत्र दुसरा सिनेमा आहे. आता १४ फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ सिनेमा काय जादू करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader