मागच्या काही दिवसांत ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी मुघल, मराठी भाषा, पाकिस्तानमधील सिंधी भाषेबद्दल बरीच वक्तव्ये केली. त्यापैकी मराठी व फारसी भाषेचा संबंध आणि पाकिस्तानमधील सिंधी भाषेबद्दल केलेल्या विधानावरून वाद झाला. या वादानंतर नसीरुद्दीन शाह यांनी स्पष्टीकरण दिलंय. हा वाद अनावश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – “त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नसीरुद्दीन शाह म्हणाले, “मी नुकत्याच बोललेल्या दोन गोष्टींबाबत पूर्णपणे अनावश्यक वाद होताना दिसत आहेत. पहिला, पाकिस्तानमधील सिंधी भाषेबद्दलच्या माझ्या चुकीच्या विधानावरून झाला. तिथे माझी चूक झाली. तर, दुसरा मराठी आणि फारसी यांच्यातील संबंधांबद्दल मी जे बोललो, त्यावरून वाद झाला. ‘बरेच मराठी शब्द फारसी मूळचे आहेत’ असं मी म्हटलं होतं. माझा उद्देश मराठी भाषेला कमी लेखण्याचा नव्हता तर विविधता सर्व संस्कृतींना कशी समृद्ध करते याबद्दल बोलण्याचा होता. उर्दू ही हिंदी, फारसी तुर्की आणि अरबी भाषांचे मिश्रण असलेली भाषा आहे. इंग्रजीने हिंदुस्तानीचा उल्लेख न करण्यासाठी सर्व युरोपियन भाषांमधून शब्द घेतले आहेत आणि पृथ्वीवर बोलल्या जाणार्या प्रत्येक भाषेबद्दल ते खरं आहे, असं मला वाटतं.”
नसीरुद्दीन शाह नेमकं काय म्हणाले होते?
“बऱ्याच मराठी भाषिकांना हे माहीत नाही की मराठीतही बरेच फारसी शब्द आहेत, ज्यांचा सर्रास वापर केला जातो. ‘आरसा’ हा फारसी शब्द आहे. ‘जकातनाका’मधील ‘जकात’ हा फारसी शब्द आहे. ‘फकत’मधून फक्त तयार झाला. असे अनेक शब्द आज मराठीचा भाग बनले आहेत, पण त्यांचं मूळ फारसी भाषेत आहे. त्याकाळात फारसी भाषा सामान्य लोकसुद्धा बोलायचे. इतकंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांनाही फारसी भाषा अवगत होती,” असं नसीरुद्दीन शाह त्यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.