ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. सध्या ते त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजच्या नव्या सीझनमुळे चर्चेत आहेत. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. या वेब सीरिजवरुनही बराच गदारोळ झाला होता, पण लोकांना ही सीरिज आवडली असून याचा दूसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
याचसंदर्भात नसीरुद्दीन शाह यांनी नुकतीच लल्लनटॉपच्या ‘सिनेमा अड्डा’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास आणि खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. याबरोबरच नसीरुद्दीन यांना राजकारणात यायची संधीदेखील मिळाल्याबद्दल त्यांनी खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “बरेच मराठी शब्द हे फारसी भाषेतील” नसीरुद्दीन शाह यांचा मोठा खुलासा; म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज…”
नसीरुद्दीन यांना काँग्रेस किंवा भाजपाच्या सरकारकडून अभिनयाची संस्था स्थापन करण्याबद्दल किंवा या क्षेत्रात योगदान देण्याबाबत कधीच विचारणा झाली नव्हती का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “मला भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारकडून कधीच याबाबत विचारणा झालेली नाही. याउलट काँग्रेसच्या कार्यकाळात मला सरधनामधून आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी विचारण्यात आलं होतं. याला २० ते २५ वर्षं झाली, मी त्या भागातला असल्याने मला विचारण्यात आलं होतं. आजही तिथे माझा चित्रपट लागला की ‘सरधने वाले नसीरुद्दीन शाह’ असं नाव झळकतं.”
याच मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन यांनी अशा बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं आहे. नसीरुद्दीन यांची ‘ताज’ या वेब सीरिजमधील अदाकारी लोकांना पसंत पडली. ही वेब सीरिज तुम्ही ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.