ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजच्या नव्या सीझनमुळे चर्चेत आहेत. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीमध्ये प्रचारकी चित्रपट, सध्याच्या सरकारकडून मुस्लिम द्वेषाला घातलं जाणारं खतपाणी यावार भाष्य केलं आहे. आधीसुद्धा बऱ्याचदा आपल्या विधानांमुळे नसीरुद्दीन शाह चर्चेत आले होते, आता पुन्हा एकदा ते याच कारणामुळे चर्चेत आहेत.
‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना सध्याची परिस्थिती आणि समाजात निर्माण होणारी द्वेषाची भावना याबद्दल नसीरुद्दीन यांनी त्यांचं परखड मत मांडलं आहे. ते म्हणाले, “सध्याची परिस्थिती ही फार चिंताजनक आहे. मुस्लिम लोकांचा द्वेष करणं ही एकप्रकारची फॅशन झाली आहे, सुशिक्षित लोकसुद्धा असेच वागताना दिसत आहेत. सध्याच्या सत्ताधारी पक्षाने अत्यंत हुशारीने ही गोष्ट त्यांच्या डोक्यात, मनात रुजवली आहे. आपण सेक्युलरिझमच्या, लोकशाहीच्या गप्पा हाकतो, तर मग प्रत्येक गोष्टीत धर्म आणायची यांना काय गरज आहे?”
आणखी वाचा : २४व्या दिवशीही ‘The Kerala Story’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रविवारी प्रेक्षकांची तिकीटबारीवर गर्दी
इतकंच नव्हे तर नसीरुद्दीन यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली आहे. मत मिळविण्यासाठी धर्माचा वापर करणार्या राजकारण्यांच्या बाबतीत निवडणूक आयोग मूग गिळून गप्प आहे आणि मुस्लिम नेत्याने “अल्लाहू अकबर” अशी घोषणा देत मते मागितली असती तर संपूर्ण विनाश झाला असता असे नसीरुद्दीन शाह यांचे म्हणणे आहे.
या मुलाखतीमध्ये त्यांनी कोणत्याही घटनेला किंवा चित्रपटाला उद्देशून थेट काहीच भाष्य केलेले नाही, पण एकंदरच ‘द केरला स्टोरी’मुळे जे वातावरण निर्माण झाले आहे त्याबद्दलच नसीरुद्दीन शाह बोलत आहेत असा अंदाज बांधला जात आहे. याआधीही नसीरुद्दीन शाह यांनी बऱ्याचदा अशी खळबळजनक सरकारविरोधी वक्तव्ये दिलेली आहेत आणि यामुळे ते बऱ्याचदा अडचणीतही सापडले आहेत.