अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या अभिनयाबरोबरच बेधडक वक्तव्य करण्यासाठीही ओळखले जातात. मध्यंतरी ‘द केरला स्टोरी’ व ‘गदर २’सारख्या चित्रपटांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने नसीरुद्दीन चर्चेत आले होते. आता मात्र त्यांनी केवळ एखाद्या चित्रपटाला नव्हे तर संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीवरच टिकास्त्र सोडले आहे. सध्याची हिंदी चित्रपटांची अवस्था फार बिकट आहे असं मत त्यांनी मांडलं आहे.
‘पीटीआय’शी संवाद साधतांना नसीरुद्दीन शाह यांनी हिंदी चित्रपटांवरील नाराजी व्यक्त करत वक्तव्य दिलं. निर्माते व दिग्दर्शक हे केवळ पैशाच्या मागे धावत असल्याने उत्कृष्ट कलाकृती तयार होत नसल्याची खंत नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केली. गेल्या दशकात जे चित्रपट बनत होते अगदी तसेच चित्रपट सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत अशी तक्रारही त्यांनी या मुलाखतीदरम्यान केली.
आणखी वाचा : ‘आर्टिकल ३७०’ला प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना अभिनेत्री यामी गौतमचं चोख उत्तर; म्हणाली, “अशा लोकांना…”
एकूणच बॉलिवूडचे चित्रपट हे नसीरुद्दीन शाह यांना अजिबात आवडत नसल्याचं त्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. ते म्हणाले, “आपण गेली १०० वर्षे एकाच प्रकारचा चित्रपट बनवत आहोत आणि आपण ही गोष्ट अभिमानाने मिरवतो आहोत हे पाहून मी प्रचंड नाराज आहे. आणखी किती वर्ष आपण तेच चित्रपट लोकांना दाखवणार आहोत. मी तर हिंदी चित्रपट पाहायचं केव्हाच बंद केलं आहे, मला ते चित्रपट अजिबात आवडत नाहीत.”
पुढे ते म्हणाले, “जर आपण या माध्यमाकडे केवळ पैसा कमावण्याचं साधन म्हणून पाहिलं नाही तरच सुधारणेसाठी वाव आहे, पण आता ती वेळही हातातून निघून गेली आहे. कारण लोकांना जे चित्रपट आता पाहायला आवडत आहेत तेच चित्रपट आता बनत राहणार आणि प्रेक्षकही तसेच चित्रपट पाहत राहणार. त्यामुळे ज्यांना खरंच काहीतरी वेगळे आणि आशयघन चित्रपट बनवायचे आहेत त्यांच्यावर आता ही एक मोठी जबाबदारी आहे. आजचे वास्तव त्यांना पटातून अशा प्रकारे मांडावेलागणार आहे जेणेकरून त्यांच्या नावाचा कुणीही फतवा काढायला नको किंवा त्यांच्या दारावर ‘ईडी’ची धाड पडायला नको.”
गेल्यावर्षी नसीरुद्दीन शाह ‘कुत्ते’, ‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’सारख्या चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये झळकले. आता ते डिज्नी प्लस हॉटस्टारच्या ‘शोटाइम’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत. या सीरिजमध्ये इमरान हाशमी, श्रीया सरन, मौनी रॉय, राजीव खंडेलवालसह नसीरुद्दीन शाहसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.