ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. चित्रपट, ओटीटी, नाटक अशा तीनही माध्यमांमध्ये नसीरुद्दिन यांनी उल्लेखनीय काम केलं. मध्यंतरी ते त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत होते. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत होते. या वेब सीरिजवरूनही बराच गदारोळ झाला होता, पण लोकांना ही सीरिज आवडली.
आता नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून लोकांसमोर येणार आहेत. ‘मॅन वुमन मॅन वुमन’ ही त्यांची शॉर्टफिल्म नुकतीच प्रदर्शित झाली आहे. सध्या पुन्हा दिग्दर्शनात उतरल्याने नसीरुद्दीन हे चर्चेत आले आहेत. याविषयी बोलतानाच नसीरुद्दीन यांनी ‘गदर २’ व ‘द काश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांवर पुन्हा भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : ‘गदर २’ व ‘जवान’नंतर आता चर्चा रणबीरच्या ‘अॅनिमल’ची; चित्रपटाच्या टीझरबद्दल मोठी अपडेट समोर
‘फ्री प्रेस जर्नल’शी संवाद साधताना नसीरुद्दीन म्हणाले, “मी ‘द केरला स्टोरी’ किंवा ‘गदर २’सारखे चित्रपट पाहिलेले नाहीत. पण त्यात नेमकं काय दाखवलं जात आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे. ही फार चिंताजनक बाब आहे की ‘द काश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट हिट होत आहेत अन् सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा, हंसल मेहता यांच्या चित्रपटांकडे प्रेक्षक लक्षही देत नाहीयेत. त्यामुळे या दिग्दर्शकांनी या गोष्टींमुळे न डगमगता त्यांचे चित्रपट लोकांसमोर आणायला पाहिजेत असं मला वाटतं.”
पुढे नसीरुद्दीन म्हणाले, “पुढच्या पिढीला आपण आपलं काम दाखवणार आहोत. १०० वर्षांनी लोक ‘भीड’ चित्रपट पाहतील आणि ‘गदर २’सुद्धा पाहणार आहेत. त्यावेळी त्यांना ध्यानात येईल की कोणत्या चित्रपटातून खरं चित्र मांडलं आहे. सध्या बरेच फिल्ममेकर्स हे चुकीच्या गोष्टी दाखवणाऱ्या अन् दुसऱ्या समाजाला बदनाम करणाऱ्या चित्रपटांशी जोडले जात आहेत. हे फार भयावह आहे.”