ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. चित्रपट, ओटीटी, नाटक अशा तीनही माध्यमांत नसीरुद्दिन यांनी उल्लेखनीय काम केलं. अभिनयाचं स्वतंत्र विद्यापीठ म्हणून नसीरुद्दीन यांच्याकडे पाहिलं जातं. नसीरुद्दीन यांच्या व्यक्तव्यामुळे बऱ्याचदा वाद निर्माण होतो. नुकतंच चित्रपटसृष्टीतील व्यवहाराबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पडद्यामागे काम करणाऱ्या कित्येक कलाकारांना योग्य वेतन मिळत नाही असं नसीरुद्दीन यांचं म्हणणं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान नसीरुद्दीन यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “चित्रपट निर्मितीसाठी जी लोक अत्यंत मेहनत घेऊन काम करतात त्यांना मिळणारा मोबदला हा फारच कमी आहे हे कटू सत्य आहे. कंबरेएवढ्या पाण्यात कित्येक तास ते उभे असतात, रिफ्लेक्टर्स आणि कित्येकांच्या बॅग घेऊन ते बरेच मैल चालतात. त्यांना कुणीच साधं चहा-पाणीदेखील विचारत नाही.”

आणखी वाचा : निर्मात्यांनी पैसे थकवण्याबाबत व मंदार देवस्थळीबद्दल शशांक केतकरने केलं सविस्तर भाष्य; म्हणाला “आत्महत्येचे विचार…”

पुढे नसीरुद्दीन म्हणाले, “आणखी दुर्दैव म्हणजे ही गोष्ट इथेच थांबत नाही. जेव्हा चित्रपट तयार होतो, प्रदर्शित होतो आणि यशस्वी होतो तेव्हा याचा पूर्ण फायदा हा वितरक आणि चित्रपट मालकांना होतो. आणि ज्यांच्यामुळे आमची ही स्वप्नं पूर्ण होतात त्यांना कुणीच विचारत नाही. त्यांना मानधन तर सोडाच पण साधा पुरस्कारही कुणीच देत नाही.”

अशा काही वक्तव्यामुळे नसीरुद्दीन हे कायम चर्चेत असतात. नसीरुद्दीन शाह हे नुकतेच ‘ताज’ या लोकप्रिय वेबसीरिजमध्ये झळकले होते. आता नसीरुद्दीन शाह हे आगामी ‘चार्ली चोप्रा’ आणि ‘द मिस्टरी ऑफ सोलांग वॅली’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naseeruddin shah speaks about crew members who helps to shoot the film avn