ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. सध्या ते त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजच्या नव्या सीझनमुळे चर्चेत आहेत. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. या वेब सीरिजवरुनही बराच गदारोळ झाला होता, पण लोकांना ही सीरिज आवडली असून याचा दूसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
याचसंदर्भात नसीरुद्दीन शाह यांनी नुकतीच ‘लल्लनटॉप’च्या ‘सिनेमा अड्डा’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास आणि खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. याच मुलाखतीत बॉलिवूड अभिनेते राजकीय मत उघडपणे का मांडत नाही? असा प्रश्न नसीरुद्दीन शाह यांना विचारण्यात आला.
आणखी वाचा : “मुस्लिमांचा द्वेष ही फॅशनच…” नसीरुद्दीन शाह यांचं सत्ताधारी पक्षाबद्दल मोठं वक्तव्य
या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, “मला वाटतं याबाबतीत त्यांना खूप असुरक्षित वाटत असावं, ज्याप्रकारे राजकीय मत मांडणाऱ्या अभिनेत्याचा छळ होतो, शिव्यांनी भरलेली पत्रं, कॉमेंट येतात ते पाहता त्यांना स्वतःच्या करिअरची चिंता वाटत असावी. मी या अशा कॉमेंट एका कानाने ऐकतो दुसऱ्या कानाने सोडून देतो, कारण माझ्यालेखी त्यांचं काहीच महत्व नाही. हे सगळे भाडोत्री लोक आहेत, सरकारकडून या लोकांना इतरांना ट्रोल करण्याचे, शिव्या घालायचे पैसे मिळतात. त्यामुळे मी यांना इतकं महत्त्व देत नाही.”
पुढे नसीरुद्दीन शाह म्हणाले, “मी यांचं का ऐकून घेऊ, उद्या समजा पंतप्रधान माझ्याविषयी काही दोन चार शब्द बोलले तर मी ते काळजीपूर्वक ऐकून घेईन, पण ते तरी माझ्याविषयी का बोलतील?” नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या अशाच स्पष्टवक्तेपणामुळे आणि बेधडक वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरुन होणाऱ्या राजकारणाबद्दलही टिप्पणी केली होती.