ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. चित्रपट, ओटीटी, नाटक अशा तीनही माध्यमांमध्ये नसीरुद्दिन यांनी उल्लेखनीय काम केलं. मध्यंतरी ते त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत होते. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत होते. आता नसीरुद्दीन पुन्हा दिग्दर्शनात पदार्पण केल्याने चर्चेत आहेत.
नुकतंच त्यांनी त्यांनी त्यांच्या वडिलांबरोबर असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. आपलं आपल्या वडिलांशी कधीच सख्य नव्हतं व ते आपल्या आयुष्यातील एक सर्वात मोठे खलनायक होते असं नसीरुद्दीन यांनी स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर आपण आपल्या वडिलांसारखं वागायचं नाही असंही अभिनेत्याने ठरवून ठेवल्याचाही खुलासा केला.
आणखी वाचा : शाहरुखच्या ‘डंकी’समोर प्रभासचा ‘सालार’ उभा ठाकणार; ट्रेड एक्स्पर्टच्या मते कोणाला बसणार फटका? जाणून घ्या
‘वी आर युवा’शी संवाद साधताना नसीरुद्दीन म्हणाले, “मी माझ्या मुलांशी माझ्या वडिलांसारखा कधीच वागणार नाही. माझ्या मुलांनी मला मिठी मारावी अन् मोकळेपणे वावरावं या मताचा मी आहे. मी माझ्या मुलांना कधीच फटकारलं नाही जे माझ्या वडिलांनी केलं. माझ्या मुलांना माझी भीती वाटायला नको. यात मला कितपत यश आलं आहे ते मला ठाऊक नाही.”
पुढे नसीरुद्दीन म्हणाले, “मी कायम माझ्या वडिलांना माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा खलनायक समजायचो अन् यामुळेच मी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी विसरायचो जसा त्यांचा हळवा स्वभाव.” नसीरुद्दीन यांच्या वडिलांची आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं ही इच्छा होती. पण एकंदर नसीरुद्दीन यांचा अभ्यासाकडे असणारा कल त्यांच्या लक्षात आला. याबद्दल नसीरुद्दीन म्हणाले, “जेव्हा मी नववीत नापास झालो तेव्हा माझे वडील मला म्हणाले की नाटकच केलंस तर पोटाची भूक काशी भागवणार?”