दाक्षिणात्य अभिनेते नासर हे त्यांच्या विविधांगी भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी दाक्षिणात्य सिनेमासह बॉलीवूडमध्येही काम केले आहे. नुकतच त्यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंग सांगितला. अक्षय कुमारच्या ‘राऊडी राठोड’ सिनेमात मुख्य खलनायकाची भूमिका करणारे अभिनेते नासर यांचा मुलगा फैसलचा २०१४ मध्ये एक अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर त्यांच्या मुलाची स्मरणशक्ती पुन्हा येण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलाला साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे सिनेमे दाखवले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओएमजी पॉडकास्टमधील मुलाखतीत नासर म्हणाले, “त्याचा अपघात झाल्यानंतर तो १४ दिवसांहून अधिक काळ बेशुद्ध होता, कोमामध्ये होता, आणि आम्ही त्याला उपचारासाठी सिंगापूरला देखील नेले. जेव्हा तो प्रथम शुद्धीवर आला, तेव्हा त्याने ‘अम्मा’ किंवा ‘अप्पा’ असं न म्हणता, ‘विजय’ हा पहिला शब्द म्हणाला.” असे भावूक होऊन नासर यांनी सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की त्यांचा मुलगा विजयचा मोठा चाहता होता. “तो विजयसारखे कपडे घालत, त्याच्या सारखा चालायचा डान्सही त्याच्यासारखा करायचा यामुळे मी त्याला खूप चिडवायचो. तो याकडे दुर्लक्ष करत म्हणायचा की त्याच्या वयात असणारे सर्वच मुलं असे कपडे घालतात.”

हेही वाचा…शो रद्द होऊनही ‘बेबी जॉन’ चित्रपटाने गाठला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा, चौथ्या दिवशी कमाईत झाली वाढ

नासर यांनी सांगितले की जेव्हा फैसलने शुद्धीवर येऊन विजयचे नाव घेतले, तेव्हा त्यांना वाटले की तो त्याच्या एखाद्या मित्राचे नाव घेत आहे. ते म्हणाले, “तो त्याच्या मित्राचे नाव घेतोय हे ऐकून आम्हाला वाटले त्याची स्मरणशक्ती गेलेली नाही आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही त्याच्या मित्राला भेटायला बोलावले. नंतर, माझ्या पत्नी कमिलाला जाणवले की तो काहीतरी वेगळे सांगण्याचा प्रयत्न करतोय. तिने त्याला सुपरस्टार विजयचा फोटो दाखवला, आणि त्याने त्याला ओळखले हे त्याच्या डोळ्यातून दिसले,” असे नासर म्हणाले. त्यांनी सांगितले की अपघातानंतर फैसलची स्मरणशक्ती परत यावी यासाठी त्यांनी विजयचे चित्रपट आणि गाणी दाखवायला सुरुवात केली.

“जेव्हा अभिनेता विजयला याबद्दल समजले, तेव्हा त्याला फैसलला भेटायला यायचे होते. आम्ही त्याला सांगितले की त्याला तसे करण्याची गरज नाही, पण माझ्या मुलाला तो भेटायला नक्की येईल हे त्याने ठरवले होते. त्याप्रमाणे विजय फैसलला अनेक वेळा भेटला आणि त्याने त्याच्याबरोबर वेळ घालवला,” असे नासर यांनी सांगितले. विजयने फैसलला एक उकुलेल (संगीत वाद्य) भेट दिल्याचा किस्साही त्यांनी सांगितला. विजयने फैसलला आश्वासन दिले की असा दिवस नक्कीच येईल जेव्हा तो ते वाजवू शकेल. “विजयने माझ्या मुलाच्या जीवनात आणि माझ्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.” असे नासर म्हणाले.

हेही वाचा…Sikandar Teaser : “सुना है की बहोत सारे…”, सलमान खानच्या बहुचर्चित ‘सिकंदर’चा टीझर प्रदर्शित; सिनेमाची रिलीज डेटही ठरली

विजय आणि नासर यांनी ‘प्रियामुदन’, ‘थमिझान’, ‘वसीगारा’, ‘सुक्रन’, ‘आधी’, ‘पोक्किरी’, ‘कुरुव’, आणि ‘थलैवा’, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nassar on son accident said we played vijay songs and films to help him regain memory psg