Nawazuddin Siddiqui : कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना कलाकार मंडळींना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक नवख्या कलाकारांना तर त्यांच्या संघर्षाच्या काळात भेदभावही सहन करावा लागतो. अनेदा हा भेदभाव दिसण्यावरुन केला जातो. काम मिळवण्यासाठी कलाकारांचा सुरु असलेला संघर्ष व त्यादरम्यान आलेले अनुभव हे कलाकार मंडळी कायमच आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. याबद्दल याआधी अनेक कलाकारांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. अशातच आता इंडस्ट्रीतील भेदभावाबद्दल प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने त्याची नाराजी व्यक्त केली आहे.

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकत्याच एका मुलाखतीत कलाकारांच्या दिसण्यावरुन त्यांच्यात भेदभाव केला जात असल्याचं भाष्य केलं आहे. मिड-डेशी साधलेल्या संवादात अभिनेत्याने म्हटलं की, “जे कलाकार नायक कसा दिसावा या विशिष्ट चौकटीत बसत नाहीत, अशा कलाकारांवर विश्वास न ठेवणे हे मनोरंजन उद्योगाचे अपयश आहे. अनेक नवीन कलाकारांच्या चित्रपटांचे काय होत आहे ते आपण पाहत आहोत.”

यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितलं की, “इरफान खान, मनोज वाजपेयी, नसीरुद्दीन किंवा ओम पुरी या कलाकारांसह कोणी २०-३० कोटी रुपयांचा चित्रपट बनवला आहे का? आज तुम्ही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करता आणि त्यांना महान कलाकार म्हणता, पण त्यांच्यासह कोणीही कधीही मोठा चित्रपट बनवला नाही.”

यापुढे नवाजुद्दिन सिद्दिकीने म्हटलं की, “आंतरराष्ट्रीय स्तरावर कलाकारांना त्यांच्या कौशल्यांवरून निवडले जाते, दिसण्यावर नाही. ते कलाकारांमध्ये फरक करत नाहीत. ते फक्त एक चांगला अभिनेता निवडतात. पण आपल्याकडे अभिनेता, नायक, स्टार, सुपरस्टार अशा श्रेणी आहेत. आपल्यामध्ये असे महान कलाकार आहेत, ज्यांना तुम्ही चित्रपट किंवा सीरिजमध्ये छोट्या भूमिकांमध्ये दिसतात. अनेकदा त्यांना सहाय्यक कलाकार म्हटलं जातं. पण ते उत्तम कलाकार आहेत. त्यांच्याबरोबर चित्रपट बनवण्याचा कोणी विचार केला नाही आणि कदाचित कोणीही कधीही करणार नाही.”

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नुकताच त्याचा ‘कोस्टाओ’ हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीनबरोबरच मराठी अभिनेत्री प्रिया बापटही मुख्य भूमिकेत आहे. शिवाय किशोर कुमारजी, गगन देव रियार आणि हुसेन दलाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नवाजुद्दीनचे अनेक चाहते बऱ्याच दिवसांपासून नव्या चित्रपटाची वाट पाहत होते आणि अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.

काही दिवसांपुर्वी ‘कोस्टाओ’ चित्रपटाचा ट्रेलर समोर आला असून या चित्रपटात नवाजुद्दीन साकारत असलेले पात्र हे स्वतंत्र भारतात होत असलेल्या सर्वात मोठ्या सोन्याच्या तस्करीचा तपास करण्याचे दाखवण्यात आलेले आहे. यादरम्यान एक कट रचला जातो, ज्यामध्ये कोस्टाओ स्वतः अडकतो आणि त्याच्यावर खुनाचा खटला सुरू आहे, अशी या चित्रपटाची कथा असल्याचे ट्रेलरवरुन दिसले. येत्या १ मे पासून नवाजुद्दीनचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.