दमदार अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता नवाजु्द्दीन सिद्दीकी गेल्या अनेक दिवसांपासून वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाजुद्दीन व त्याच्या कुटुंबियांनी छळ केल्याचं आलिया म्हणाली होती. त्यानंतर आलियाने नवाजुद्दीवर बलात्कार केल्याचा आरोपही केला होता.
नवाजुद्दीन व आलियाच्या प्रकरणावर त्याचा भाऊ शमासने एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं आहे. शमासने नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने नवाजुद्दीन व आलियाच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. शमास म्हणाला, “आलियाला मी नवाजु्द्दीनशी लग्न करण्याच्या आधीपासून ओळखतो. ती माझी चांगली मैत्रीण आहे. नवाजुद्दीन व आलियामध्ये आधीपासूनच बिनसलं होतं. सुरुवातीला ते एकमेकांना समजून घ्यायचे. परंतु, नंतर त्यांच्यातील मतभेद वाढू लागले. एक महिला म्हणून आलियाने खूप सहन केलं आहे. २०२० मध्येच मी नवाजबरोबर काम करणं बंद केलं होतं. त्यानंतर काहीच दिवसांनी नवाज व आलियाचं प्रकरण समोर आलं. सुरुवातीला मी याबाबत काहीच बोललो नव्हतो. सगळ्या गोष्टी सांभाळण्याचा मी प्रयत्न केला. पण जेव्हा काही व्यक्तींची नवाजबरोबर जवळीक वाढली तेव्हा मी त्याची साथ न देण्याचा निर्णय घेतला”.
नवाजुद्दीनबरोबर काम न करण्याच्या निर्णयाचंही या मुलाखतीत शमासने स्पष्टीकरण दिलं. “मी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. एका शोचं मी दिग्दर्शनही केलं आहे. नवाजने मला त्याच्याबरोबर काम करण्यासाठी विचारलं होतं. जवळच्या व्यक्तींबरोबर टीम तयार करणार असल्याचं नवाज म्हणाला होता. २०१९ साली माझा ‘बोल चुडियां’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात नवाजने काम करावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. एकत्र काम केल्यामुळे आमचे वैयक्तिक संबंध बिघडतील, अशी मला भीती होती. पण निर्मात्यांनी नवाजला घेण्याबाबत आग्रह केल्यामुळे त्या चित्रपटात नवाजने काम केलं. परंतु, नंतर नवाजने पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय काम करण्यास नकार दिला. त्यानंतर आमच्यात मतभेद झाले. त्याने मला त्याच्या मुलीचा चेहराही पाहू दिला नाही”, असं शमास म्हणाला.
हेही वाचा>> एमसी स्टॅन लवकरच विवाहबंधनात अडकणार? गर्लफ्रेंडचा उल्लेख करत म्हणाला, “चार ते पाच वर्षांपासून…”
नवाजच्या आईने आलियाचं दुसरं मुल अनैतिक संबंधातून जन्मल्याचं म्हटलं होतं. यावरही शमासने मुलाखतीत भाष्य केलं. तो म्हणाला, “माझ्या आईने रागात ते वक्तव्य केलं होतं. पण नवाजुद्दीने कधीच त्याच्या दुसऱ्या मुलाला नाकारलेलं नाही. नवाजुद्दीनने न्यायालयात घटस्फोटाची कोणती कागदपत्र सादर केली आहेत, याबाबत मला माहीत नाही. कारण, अशा कोणत्याच कागदपत्रांवर स्वाक्षरी न केल्याचं आलियाने म्हटलं आहे”.