मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या कलाकारांमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी याचं नाव वरच्या स्थानी येतं. चित्रपट असो अथवा वेब सिरीज त्याने त्याच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. आता भारतीय चित्रपटांबरोबरच तो लवकरच परदेशी चित्रपटामध्ये झळकणार आहे. यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्याने परदेशी चित्रपट करण्याबाबत मोठा खुलासा केला.
नवाजुद्दीन ‘लक्ष्मण लोपेज’ या अमेरिकी इंडी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट नाताळवर आधारित असून रॉबर्टो जिरॉल्ट चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. परदेशी चित्रपटात प्रमुख भूमिका सकारायला मिळणार असेल तरच तो चित्रपट करणार असा निश्चय त्याने केला होता, असं त्याने सांगितलं.
आणखी वाचा : न्यासा देवगणच्या न्यू इअर सेलिब्रेशनचे ‘ते’ फोटो पाहून नेटकरी संतापले, म्हणाले “आई-वडिलांची अब्रू धुळीला…”
नवाजुद्दीन म्हणाला, “मी माझ्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट केले ज्याच्यात माझ्या अगदी छोट्याशा भूमिका होत्या. त्या सगळ्या भूमिका मी मनापासून साकारल्या, पण आता मला २५ कोटी जरी दिले तरी मी छोटी भूमिका साकारणार नाही.”
“पैसा आणि प्रसिद्धी हा तुमच्या कामाचा भाग असतो. जर तुम्ही तुमचं काम मनापासून आणि शंभर टक्के देऊन केलं तर प्रसिद्धी आणि पैसा तुमच्याकडे चालून येणारच आहे. पण तुम्ही यांच्या शोधात पळाला तर तुम्हाला त्या गोष्टी कधीच मिळणार नाहीत. बरे असतात आपण पैसा प्रसिद्धी यांच्या मागे पाळतो पण आपल्या हाती काहीच लागत नाही. त्यामुळे आपण काम करत राहिलं पाहिजे. स्वतःच असं व्यक्तिमत्त्व तयार करा, स्वतःला असं बदला की पैसा आणि प्रसिद्धी तुमच्याकडे तुमच्या मागे धावून येईल,” असंही त्याने सांगितलं.