मनोरंजन विश्वात नवाजुद्दीन सिद्दिकी हे नाव जवळजवळ सगळ्यांनाच परिचित आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्याने बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. भूमिका कोणतीही असो; आपल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देण्यासाठी ज्या कलाकारांचे नाव घेतले जाते, त्यापैकी नवाजुद्दीन सिद्दिकी एक आहे. आता रणवीर अल्लाहबादिया याच्या यूट्यूबवरील पॉडकास्ट कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. सिगारेटचे आपल्याला कसे व्यसन होते आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम झाला याबद्दल वक्तव्य केले आहे.

रणवीर अल्लाहबादियाबरोबर बोलताना नवाजुद्दीन म्हणाला, “मला सिगारेट ओढण्याचे व्यसन लागले होते आणि पूर्णत: त्याच्या आहारी गेलो होतो. पण, व्यसन कायम सुरू ठेवणे शहाणपणाचे नाही हे माझ्या लक्षात आले. पुढे बोलताना तो म्हणतो, मी अशा लोकांच्या संगतीत होतो; जे सिगारेट ओढत असायचे आणि मला सिगारेट ओढण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. मीदेखील तेच करायचो. मला नंतर ही गोष्ट लक्षात आली. व्यसन करणे अयोग्यच आहे; पण त्यात मजा होती. मी या गोष्टींना प्रोत्साहन देऊ इच्छित नाही, ती चूक आहे आणि त्याबद्दल मी माफी मागतो. सिगारेटशिवाय मी अनेक वेळा भांगदेखील प्यायलो आहे. विशेषत: होळीला भांग पिऊन नाटक करणे ही माझ्यासाठी सामान्य बाब होती. भांग प्यायल्यावर वाटायचे की, मी जगातील सगळ्यात मोठा अभिनेता आहे आणि हे लोक माझे सादरीकरण पाहणारे प्रेक्षक असून जग माझ्यासाठी व्यासपीठ आहे. कधी मी अश्वत्थामा व्हायचो, कधी कृष्ण, तर कधी कर्ण बनून मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सादरीकरण करीत असे. याचा परिणाम असा झाला की, इतर वेळीदेखील नाटकातील संभाषण सतत म्हणत असे. लोक मला म्हणायचे की, तुला वेड लागले आहे का? मी बागेत, बसमध्ये कुठेही मला वाटेल तिथे सादरीकरण करीत असे.”

दरम्यान, गेल्या काही काळापासून नवाजुद्दीन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे मोठ्या चर्चेत होता. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, २०२३ या वर्षात ‘अफवाह’, ‘जोगिरा सारा रा रा’ , ‘टिकू वेड्स शेरू’ व हड्डी’ यांसारख्या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रौतू का राज ही त्याची वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. आता नवाजुद्दीन कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.