अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे. गेले काही दिवस तो पत्नी व भावाबरोबरच्या वादामुळे चर्चेत आहे. त्याच्या भाऊ शमास आलियाची बाजू घेत सातत्याने अभिनेत्यावर टीका करत आहे. एकूणच हे प्रकरण दरदिवशी वेगळं वळण घेत आहे. अशातच नवाजुद्दीन आता पुन्हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. त्याचा आगामी ‘जोगीरा सा रा रा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
यानिमित्त नवाजने नुकतीच ‘अमर उजाला’ या वेबपोर्टला एक खास मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये नवाजुद्दीनने चित्रपटाबद्दल गप्पा मारल्या तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबद्दल भाष्यदेखील केलं. नवाजुद्दीनच्या आगामी चित्रपटात ‘शादी टॉर्चर है’ असं एक गाणं आहे. या गाण्यावरून नवाजुद्दीने त्याचे लग्नाबद्दलचे विचार शेअर केले आहेत.
आणखी वाचा : ‘The Kashmir files’ प्रमाणेच ‘The Kerala Story’देखील सुपरहीट ठरणार का? वाचा बिझनेस ट्रेंड काय सांगतो
या गाण्याविषयी काय वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देताना नवाजुद्दीन म्हणाला, “मी तर एवढंच सांगेन की लग्न करायचा निर्णय प्रत्येकाने योग्य तो विचार करूनच घ्यावा. लग्नानंतर तुमच्याबाबतीत चांगल्या गोष्टी घडो किंवा वाईट गोष्टी घडो, त्याचं खापर तुम्ही तुमच्या आई वडिलांवर फोडू नका. लग्नाची परंपरा ही आपल्या समाजानेच सुरू केली आहे. समाजाने काहीतरी चांगला विचार करूनच ही परंपरा सुरू केली आहे. आधी आपले वडील आजोबा लग्न करायचे तेव्हा ते ज्यापद्धतीने त्यांच्या पत्नीबरोबर सलोख्याने राहायचे तशी गोष्ट आपल्याला सध्या पाहायला मिळततही नाही.”
नवाजुद्दीन आणि त्याच्या पत्नीमधील वादाचा परिणाम करिअरवर झाला आहे का? या प्रश्नाचं त्याने उत्तर द्यायचं टाळलं. दरम्यान, पत्नी आलियाने केलेल्या सर्व आरोपांवर काही दिवसांपूर्वी स्टेटमेंट प्रसिद्ध करत नवाजुद्दीनने त्याची बाजू मांडली होती. आपला घटस्फोट झाला असून पैशांसाठी आलिया आपली प्रतिमाहनन करत असल्याचा दावा नवाजुद्दीनने केला होता. नवाजुद्दीनच्या आगामी चित्रपटात नेहा शर्मा ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.