बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या अनेक दिवसांपासून वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. नवाजच्या कुटुंबियांनी छळ केल्याचा आरोपही तिने केला होता. पत्नीच्या आरोपांनंतर नवाजच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीनेही त्याच्यावर आरोप केले होते. दोन महिन्यांचा पगार न दिल्याचा आरोप मोलकरणीने केला होता. परंतु, त्यानंतर तिने नवाजउद्दीनवरील सर्व आरोप मागे घेतले आहेत.
पत्नी आलिया व मोलकरणीने गंभीर आरोप केल्यानंतर नवाजुद्दीन पहिल्यांचा कॅमेऱ्यासमोर आला आहे. नवाजुद्दीनने पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टंट बॉलिवूडशी बोलताना नवाजउद्दीनने पत्नीने केलेल्या आरोपांबाबत भाष्य केलं आहे. “मला याबाबत जास्त काही बोलायचं नाही. पण या प्रकरणामुळे माझ्या मुलांचं फार नुकसान होत आहे. माझी मुलं दुबईत शिक्षण घेतात. परंतु, गेल्या महिन्याभरापासून ते इथे माझ्याबरोबर आहेत. माझ्या मुलांचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे”, असं नवाजुद्दीन म्हणाला आहे.
हेही वाचा>> शाहरुख खानच्या ‘पठाण’ने १००० कोटींची कमाई केल्यानंतर स्वरा भास्करचं ट्वीट, म्हणाली “बॉयकॉट गँग…”
नेमकं प्रकरण काय?
नवाजुद्दीनच्या आईने त्याची पत्नी आलियाविरोधात कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आलिया नवाजुद्दीनच्या बंगल्यावर गेल्यानंतर त्याची आई व पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर नवाजुद्दीनच्या आईने वर्सोवा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर आलियाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं.
पत्नीचे गंभीर आरोप
नवाजुद्दीनच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाजउद्दीन व त्याच्या कुटुंबियांनी घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असल्याचं आलियाचं म्हणणं आहे. याशिवाय, नवाजच्या कुटुंबियांनी छळ केल्याचा आरोपही तिने केला आहे. नवाजने खोलीत सीसीटीव्ही लावले शिवाय खोलीबाहेर २४ तास बॉडीगार्ड तैनात केल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियाने २००९ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना शोरा नावाची एक मुलगी असून यानी नावाचा एक मुलगा देखील आहे. आलियाने मे २०२०मध्ये नवाजउद्दीनशी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.