अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचा पत्नी आलिया व भावांबरोबर संपत्तीवरून वाद सुरू आहे. या वादादरम्यान नवाजुद्दीनने एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सध्याच्या अपडेटनुसार, अभिनेत्याने उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील बुढाणा गावातील जमीन त्याच्या भावांना हस्तांतरित केली आहे. नवाजुद्दीन रजिस्ट्रार कार्यालयात पोहोचला होता आणि त्याचा भाऊ अलमसुद्दीन सिद्दीकी आणि तहसीलचे वकील प्रशांत शर्मा आधीच तेथे उपस्थित होते. नवाजुद्दीने त्याच्या अर्ध्याहून अधिक जमिनीवरील पॉवर ऑफ अॅटर्नी आपल्या एका भावाला दिली आहे.
वकील प्रशांत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या सर्व वडिलोपार्जित संपत्तीची पॉवर ऑफ अॅटर्नी त्याचा भाऊ अलमसुद्दीनला हस्तांतरित केली आहे. यावेळी त्याने दुसर्या मृत्युपत्रात तो जिवंत असेपर्यंत मालमत्तेवर त्याचा हक्क असेल, असं लिहिलं आहे. त्याच्या मृत्यूनंतर अलमसुद्दीन, माजुद्दीन आणि मिन्हाजुद्दीन सिद्दीकी या भावांमध्ये संपत्तीची समान वाटणी केली जाईल.