बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. अभिनयाच्या जोरावर नवाजने बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण, एक काळ असा होता जेव्हा छोट्या छोट्या भूमिका मिळवण्यासाठीही नवाजला खूप संघर्ष करावा लागला होता. अनेकदा त्याच्या दिसण्यावरूनही त्याला चित्रपट नाकारण्यात आले होते. नुकतंच एका मुलाखतीत नवाजने आपल्या रंगावरून मोठं वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा- सुश्मिता सेन- रोहमन शॉलमध्ये पॅचअप? दोघांच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे चर्चांना उधाण
‘बॉलीवूड बब’ला दिलेल्या मुलाखतीत नवाजने त्याच्या लूकबाबत मोठा खुलासा केला. नवाज म्हणाला, माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला माझ्या रंगामुळे अनेकदा असुरक्षित वाटायचे. रंग उजळण्यासाठी मी खूप क्रीम लावले, पण फरक पडला नाही. नंतर मला लक्षात आलं, माझा रंग बदललाच नाही, तो पूर्वीसारखाच आहे.”
हेही वाचा- तुळशीला पाणी घातल्यामुळे अमिताभ बच्चन झाले ट्रोल; पण का? घ्या जाणून
नवाजुद्दीन पुढे म्हणाला, “माझ्या आजूबाजूच्या लोकांना मी चांगला दिसत नाही असं वाटायचं. मलाही असंच वाटायचं. पण, काही काळानंतर मी हा विचार सोडून दिला. जेव्हा मी हा विचार करणं सोडलं, तेव्हा मला जाणवलं की मी चांगला दिसतो. माझा चेहराही चांगला आहे. असुरक्षितता तुमच्या आजूबाजूच्या लोकांमुळे निर्माण होते. तुम्ही जसे दिसता याबाबत आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. “मी एक अभिनेता आहे हे सिद्ध करण्यासाठी मला १०-१२ वर्षे लागली. पण, हा फरक नेहमीच राहील; कारण लोकांच्या मनात एक विशिष्ट धारणा आणि प्रतिमा असते. पण, हा एक संघर्ष आहे आणि तो नेहमीच राहील.”
नवाजुद्दीनच्या कामाबाबत बोलायचं झालं तर गेल्या काही महिन्यात त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. आता लवकरच त्याचा ‘सैंधव’ नावाचा दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नवाजबरोबर साऊथचा सुपरस्टार व्यंकटेश, आर्या, श्रद्धा श्रीनाथ, रुहानी शर्मा, आंद्रिया जेरेमिया, सारा, जयप्रकाश यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शैलेश कोलानू दिग्दर्शित हा चित्रपट १३ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होईल. तेलगूबरोबरच तामिळ, मल्याळम व हिंदी भाषांमध्येही तो प्रदर्शित होणार आहे.