‘सेक्रेड गेम्स’सारख्या सीरिजमुळे सगळ्यांच्याच परिचयाचा झालेला नवाजुद्दीन सिद्दिकी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला बराच संघर्ष करावा लागला. अभिनयाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात नाव कमावणं त्याच्यासाठी नक्कीच सोपं नव्हतं. नवाजने १९९९ सालच्या सरफरोश चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
आजही हटके आणि काहीतरी वेगळी भूमिका सादर करण्यासाठी नवाजुद्दीन ओळखला जातो. नुकतंच त्याने त्याचा आगामी चित्रपट इफ्फीमध्ये प्रदर्शित होणार असल्या कारणाने त्याच्याशी निगडीत एका पत्रकार परिषदेला हजेरी लावली. नवाजुद्दीन सध्या एकाच प्रकारच्या भूमिका करतोय असा आरोप बऱ्याचदा त्याच्यावर लागला आहे. या पत्रकार परिषदेत त्याने यावर आणि त्याला भविष्यात कोणत्या भूमिका करायला आवडतील यावर भाष्य केलं आहे.
नवाजुद्दीन म्हणाला, “मी कधीच स्वतःला एका साच्यात बसवलेलं नाही. याचं संपूर्ण श्रेय माझ्या दिग्दर्शकांना जातं, त्यांनी कायम माझ्याकडून काहीतरी वेगळं काढण्याचाच विचार केला. कधी कधी आम्ही जे प्रयोग करतो ते फसतात, पण हीच खरी संधी असते शिकायची. आयुष्यातील हे धडे गिरवण्यासाठीच मी वेगवेगळ्या भूमिका करतो.”
भविष्यात कोणती भूमिका करावीशी वाटेल याबद्दल बोलताना नवाजुद्दीन म्हणाला, “मला भविष्यात संधी मिळाली तर आध्यात्मिक गुरु ओशो यांची भूमिका साकारायला मला आवडेल.” नवाजुद्दीनचा ‘रौतु की बेली’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखवला जाणार आहे. हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री असणार आहे असंही नवाजुद्दीनने या मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं. गँग्स ऑफ वासेपूर, सीरिअस मॅन, हड्डी, फ्रीकी अली, सेक्रेड गेम्स सारख्या कलाकृतीतून नवाझुद्दीनने त्याची क्षमता सिद्ध केली आहे त्यामुळे ओशो यांच्या बायोपिकमध्येसुद्धा नवाजुद्दीन तितकाच फिट बसेल अशी खात्री प्रेक्षकांना आहे.