बॉलीवूडमध्ये सर्वात प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या ६९ व्या फिल्मफेअर सोहळ्याचं आयोजन यंदा गुजरातमध्ये करण्यात आलं होतं. दरवर्षी मुंबईत होणारा फिल्मफेअर सोहळा गुजरातमध्ये पार पडल्याने गेल्या काही दिवसांपासून विरोधकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. यासंदर्भात याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्ट शेअर केल्या होत्या. आता याबाबत रोहित पवार यांनी एक्स पोस्ट शेअर करत सरकारला लक्ष्य केलं आहे.
उत्तर प्रदेशात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही दिवसांपूर्वीच मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी नामांकित उद्योगपती आणि उद्योगसमूहांशी चर्चा केली. याशिवाय उत्तर प्रदेशात लवकरच चित्रनगरी (फिल्मसिटी) उभारण्यात येत असल्याने त्यादृष्टीने बॉलीवूडमधील ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, कलावंत यांच्याशी देखील योगी आदित्यनाथ यांनी चर्चा केली होती. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्ट शेअर करत सरकारवर टीका केली आहे.
हेही वाचा : “माझे वडील संघी नाहीत”, मुलगी ऐश्वर्याच्या विधानावर रजनीकांत म्हणाले, “तिने संघी हा शब्द वाईट…”
“मुंबईतले उद्योग, IFSC सेंटर, हिरे व्यापार यानंतर आता मुंबईतल्या चित्रपट उद्योगावर महाराष्ट्रविरोधी शक्तींचा डोळा आहे. चित्रपट सृष्टीचे निर्माते दादासाहेब फाळके यांच्या योगदानाने उभ्या राहिलेल्या चित्रपट नगरीचे महत्व कमी करण्यासाठी आधी filmfare पुरस्कार सोहळा गुजरातला गेला आता उत्तर प्रदेशात फिल्मनगरी उभारण्याच्या हालचाली सुरु आहेत.” अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
“असे असताना आपले गोलमाल सरकार मात्र खुर्ची टिकवण्यासाठी कुठलाही विरोध न करता केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, परंतु कोणी कितीही ताकद लावली आणि या बाह्य शक्तींना आपल्याच गद्दारांनी कितीही मदत केली तरी मुंबईचं हे वैभव कुणालाही हिसकावून नेता येणार नाही. शेवटी IFSC सेंटर, डायमंड बोर्स बाबतीत जे झालं तेच होईल कारण मुंबई ही मुंबई आहे… महाराष्ट्राचा प्राण आहे!” असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : अरबाज खानचं शुरा खानशी दुसरं लग्न, सलमान खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला…
दरम्यान, यंदाचा ६९ वा ह्युंडाई फिल्मफेअर सोहळा गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे २७ व २८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी हा सोहळा मुंबईतच आयोजित केला जातो. केवळ २०२० मध्ये फिल्मफेअरचं आयोजन गुवाहाटीमध्ये करण्यात आलं होतं. आधीच मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले असताना फिल्मफेअर पुरस्कार सोहळाही गुजरातला गेल्याने विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.