बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. गेली अनेक वर्ष त्या सातत्याने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करत आहेत. नीना गुप्ता या सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रिय असतात. आता नीना गुप्ता या त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. नीना गुप्ता यांनी फेमीनिजमविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे, याबरोबरच त्यांनी स्त्री-पुरुष समानता यावरही परखड भाष्य केलं आहे.
प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्ट शोवर नीना गुप्ता यांनी हजेरी लावली. मुलाखतीदरम्यान नीना गुप्ता म्हणाल्या, “मला हे सांगावं असं वाटतंय की सध्याच्या फालतू फेमीनिजमकडे दुर्लक्ष करणं फार गरजेचं आहे, तसंच महिला या पुरुषांच्या समान आहेत याकडे दुर्लक्ष करायला हवं. आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यापेक्षा अन् कामाकडे कायम लक्ष देण्यापेक्षा जर तुम्ही गृहिणी असाल तर त्याला कमी लेखू नका, ते सुद्धा फार महत्त्वाचं काम आहे, तुम्ही स्वतःला कमी लेखणं थांबवा, हाच संदेश मला लोकांना द्यायचा आहे.”
पुढे स्त्री-पुरुष समानतेबद्दल भाष्य करताना नीना गुप्ता म्हणाल्या, “स्त्री आणि पुरुष हे अजिबात सारखे नाहीत, ज्यादिवशी पुरुष गरोदर राहायला सुरुवात होईल तेव्हा आपण स्त्री-पुरुष समान आहोत असं म्हणू शकतो.” ही गोष्ट सांगताना नीना गुप्ता यांनी स्वतःचं उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या, “एके दिवशी मला सकाळी ६ वाजताची फ्लाइट पकडायची होती. त्यावेळी माझा कुणी बॉयफ्रेंड नव्हता जो मला सोडायला येईल. मी पहाटे ४ वाजता घराबाहेर पडले तेव्हा चांगलाच अंधार होता. त्यावेळी एक माणूस माझा पाठलाग करू लागला, मी तेव्हा घाबरून पुन्हा घरी गेले अन् माझी तेव्हाची फ्लाइट चुकली. दुसऱ्या दिवशी मी सेम फ्लाइटचं तिकीट काढलं, पण त्यावेळी मी माझ्या मित्राच्या घरी राहिले अन् त्याने मला सोडलं. त्यावेळी मला पुरुषाची गरज भासली.”
स्त्रियांना पुरुषांची गरज पडते ही गोष्ट नीना यांनी त्यांच्या या उदाहरणाच्या माध्यमातून स्पष्ट केलं. याबरोबरच इतरही विषयांवर त्यांनी भाष्य केलं आहे. नीना गुप्ता नुकत्याच सोनी लीव्हच्या ‘चार्ली चोप्रा’ व नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ या सीरिजमध्ये झळकल्या होत्या. दोन्ही चित्रपटात नीना यांच्या कामाची खूप प्रशंसा झाली.